ठाणे - भिवंडी शहरातील नवीवस्ती भागात असलेल्या गौतम कंपाउंडमधील एका मोती कारखान्यात आज भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशमन दलाच्या २ गाड्या घटनास्थळी होऊन आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे.
हेही वाचा - Omicron Variant In kalyan Dombivali - परदेशातून २९४ नागरिक कल्याण डोंबिवलीत; ७० जणांची कोरोना चाचणी
भीषण आगीत तासाभरातच संपूर्ण मोती कारखाना जाळून खाक झाला. सुदैवाने आगीची घटना घडली त्यावेळी कारखाना बंद असल्याने जीवितहानी टळली. मात्र, या आगीत मशीनरीसह लाखोंचे प्लास्टिक दाणे जळून खाक झाले आहेत. खळबळजनक बाब म्हणजे, भिवंडी महापालिका हद्दीत मोती कारखान्यांना बंदी असूनही हा कारखाना बेकायदा सुरू असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले.
ज्वलनशील पदार्थचा साठा असल्याने आगीचा भडका
कारखान्यात केमिकलयुक्त ज्वलनशील पदार्थांचा साठा तसेच, प्लास्टिक दाण्यापासून मोती तयार करून ठेवलेल्या साठ्यामुळे काही क्षणातच कारखान्यात आग पसरून संपूर्ण कारखाना भीषण आगीत जळून खाक झाला. विशेष म्हणजे, मोती कारखान्यात सकाळच्या सत्रातील कामगार काम सुरू करण्याआधीच अचानक आगीची घटना घडली होती. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे २ बंब घटनास्थळी दाखल होवून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जवानांनी अथक प्रयत्न केले आणि आग आटोक्यात आणली. सध्या या ठिकाणी 3 तास कुलींगचे काम सुरू होते. आगीचे कारण अध्यापही समजू शकले नाही. या आगीत लाखों रुपयांचा मोतीचा साठा व मशीनरी जळून खाक झाल्या आहेत. या आगीमुळे परिसरातील नागरीवस्तीत धुराचे लोट पसरले होते.
भिवंडीतील अग्नितांडव थांबणार कधी ?
भिवंडी शहरात मोठ्या प्रमाणात नागरीवस्तीमध्ये बेकादेशीर मोती कारखाने आहेत. या गोदामांमध्ये अत्यंत ज्वलनशील असे, अतिधोकादायक केमिकल व साहित्य असलेला साठा केला जातो. या साठ्यांना वारंवार आगी लागण्याचे प्रकार घडत आहेत. ५ वर्षांपूर्वीही याच परिसरातील एका मोती कारखान्याला आग लागून २ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यावेळी पालिका प्रशासनाने शहरातील मोती कारखाने बंद करण्याचे फर्मान काढून संबधित कारखाना मालकांना नोटीस बजावल्या होत्या. मात्र, पालिकेची ती कारवाई कागदावरच राहिल्याचे दिसून आले. तीन वर्षांपूर्वी भिवंडी - ठाणे महामार्गावरील राहनाळ येथे लागलेल्या आगीत लाकडाच्या वखारीत झोपेत असलेल्या ६ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता. तसेच, गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये दापोडा येथे लागलेल्या आगीत ३ कामगार होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. भिवंडीतील यंत्रमाग कारखाने व गोदामांना वारंवार आगी लागण्याचे सत्र सुरू असताना आज मोती कारखान्याला लागलेल्या आगीच्या निमित्ताने भिवंडीतील अग्नितांडव थांबणार कधी? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
हेही वाचा - Omicron in Dombivali : सौम्यलक्षणे असलेला ओमायक्रॉनचा रुग्ण डोंबिवलीत आढळला... ६ जण संशयित