ठाणे - मागिल तीन दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुख्य रेल्वे स्थानकाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने प्रवाश्यांना त्रास सहन करावा लागत आहे. सततच्या पावसाने रेल्वे सेवेवरही परिणाम झाला असून, अनेक ठिकाणी रुळांवर पाणी साचल्याने रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे. कार्यालयीन वेळ असल्याने स्थानकावर लोकांची गर्दी झाली असल्याचे पाहण्यात येत आहे.
शहरातील अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुक संथ गतीने चालू आहे. तलावपाळी, वंदना सिनेमा, घोडबंदर रोड या ठिकाणी पाणी साचल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
येत्या 24 तासांत जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केल्याने ठाणेकर धास्तावले आहेत.