ठाणे - मध्य रेल्वेच्या कल्याण कर्जत मार्गावरील गेल्या काही वर्षापासून बदलापूर, अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या लांब राहणाऱ्यांसह चिखलोली गावातील नागरिकांची चिखलोली रेल्वे स्थानकाची प्रतीक्षा आता संपली असून रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वेच्या चिखलोली रेल्वे स्थानकाच्या कामाला ग्रीन सिग्नल दिला आहे. येत्या काही दिवसात चिखलोली रेल्वे स्थानकाच्या कामकाजाची सुरुवात होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने जाहिर केलेल्या एका पत्रकात देण्यात आली आहे.
दोन वर्षात स्थानकाची उभारणी
अंबरनाथ आणि बदलापूर या दोन रेल्वे स्थानकाच्या दरम्यान जवळपास आठ मिनिटांचा अंतर आहे. तसेच अंबरनाथ आणि बदलापूरच्या मध्ये राहणारे चिखलोली, चोण एरंजाड बारवी एमआयडीसी समवेत अन्य गावातील प्रवाशांना बदलापूर आणि अंबरनाथ रेल्वे स्थानकाकडे जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दररोज त्यांना आर्थिक भुर्दंड तर बसतोच शिवाय शारीरिक व मानसिक त्रास मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून आमदार किसन कथोरे आणि डॉ. बालाजी किन्हीकर समवेत अन्य राजकीय व सामाजिक संघटनांच्यावतीने अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये चिखलोली रेल्वे स्थानकाची मागणी करीत होते. ही मागणी लक्षात घेऊन कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी केंद्र शासनाच्या दरबारी व रेल्वे बोर्डाकडे मागणी उचलून धरल्याने शेवटी रेल्वे प्रशासनाने चिखलोली रेल्वे स्थानिकाच्या उभारणीसाठी परवानगी दिली आहे.
प्रवाशांना दिलासा
आता या स्थानकाच्या कामाला तातडीने सुरुवात करण्यात येणार असून दोन वर्षात या रेल्वे स्थानकाचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.