ठाणे - ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सन 2020-2021 या आर्थिक वर्षासाठी दिवाळी सणानिमित्त साडे पंधरा हजार रुपये इतके सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी सोमवारी (दि. 25) केली. या संदर्भात राज्याचे नगर विकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॅा. जितेंद्र आव्हाड यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर महापौरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
इतक्या कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ
या बैठकीत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना यावर्षी 15 हजार 500 रुपये इतके सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे महापालिका आस्थापनेवरील कायम अधिकारी कर्मचारी 6 हजार 885 एकत्रित मानधनावरील कर्मचारी 314, शिक्षण विभागाकडील एकूण कर्मचारी 973 आणि परिवहन सेवेमधील 1 हजार 897 कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे.
दिवाळीपूर्वी मिळणार सानुग्रह अनुदानाची रक्कम
या निर्णयामुळे ठाणे महापालिकेस सानुग्रह अनुदानापोटी एकूण 16 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. हे सानुग्रह अनुदान दिवाळीपूर्वी सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात येणार असल्याचे महापालिका आुयक्त डॅा. विपिन शर्मा यांनी सांगितले.
ठाणे पालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट
सध्या ठाणे महापालिकेच्या तिजोरीत फक्त 9 कोटी शिल्लक आहेत. सातव्या वेतन आयोगामुळे महापालिकेच्या वार्षिक खर्चामध्ये 167 कोटी रुपयांचा बोजा पडण्याची शक्यता आहे. त्यामध्ये नियमित कर्मचाऱ्यांवर 114 कोटी तर सेवानिवृत्ती वेतनधारकांचे 52 कोटींचा अतिरिक्त खर्च वाढणार आहे. तर 2020-2021 मध्ये 713 कोटी पगारावर खर्च केला जात होता.
तिरोजीत खडखडाट असताना ठाणे महापलिकेत सातवा वेतन आयोग लागू
एकीकडे कोरोनामुळे ठाणे महापालिकेच्या तिजोरीला मोठी घरघर लागली आहे. मात्र, दुसरीकडे पालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. त्यामुळे पालिकेच्या तिजिरीवर अंदाजे 167 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.
हे ही वाचा - 'लाचलुचपत'च्या जाळ्यात अलगदच अडकला भविष्य निर्वाह निधीचा कर्मचारी