ठाणे - भोपाळ येथील एनआयएचएसएडी येथे महाराष्ट्रातून एव्हीयन इन्फ्लूएन्झा चाचणीसाठी प्राप्त नमुन्यांचा प्रयोग शाळेतून प्राथमिक निकाल समोर आला आहे. या नुसार ठाण्यातील ३ पाण बगळे आणि १ पोपट बर्ड फ्लू पॉझिटिव्ह आल्याचा अहवालात स्पष्ट झाले आहे. ठाणे महापालिकेकडे याचा अहवाल आला नसल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.
पालिकेच्या वतीने बर्ड फ्लूमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होवू नये, नागरिकांना योग्य माहिती मिळावी यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. नागरिकांनी मृत पक्ष्यांची माहिती मिळताच तात्काळ नियत्रंण कक्षाला कळविण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.
देशात काही राज्यांमध्ये बर्ड फ्लूची साथ आली आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेने सतर्ककतेचा उपाय म्हणून नियंत्रण कक्ष निर्माण केला आहे. या साथीमुळे नागरिकांनी घाबरून न जाता मृत झालेल्या पक्ष्यांची माहिती तात्काळ नियंत्रण कक्षास देण्याचे आवाहन महापौर आणि महापालिका आयुक्त यांनी केले आहे. ठाणे महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या निगरानीखाली हा नियंत्रण कक्ष स्थापन केला असून नागरिकांनी प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष येथील टोल फ़्री -1800 222 108 तसेच 022 -25371010 या हेल्पलाईनवर माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
ठाण्यात काही दिवसांपूर्वी मिळालेल्या पक्षांच्या मृतदेहाचे रिपोर्ट बर्ड फ्लू आहेत. केंद्र सरकारने राज्यात ठाणे परभणी दापोली आणि बीड येथील नमुने बर्ड फ्लू पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आसल्याचे सांगीतले आहे. यामुळे योग्य ती खबरदारी घेण्याचा आवाहन केंद्र सरकारने केले आहे.