ठाणे - रेल्वे स्थानकातील पश्चिमेला सॅटिसच्या बाजूला असलेल्या वाहनतळाच्या इमारतीतील पहिल्या मजल्यावरील वाहानतळ दुचाकी चालकांना वाहने उभी करण्यासाठी विनाशुल्क खुले केले जाणार आहे. पहिल्या मजल्याचे वाहनतळ तयार होऊन सहा महिने उलटले आहेत. हे वाहनतळ चालविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मागवलेल्या निविदेला ठेकेदारांचा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा - उल्हासनगरात हँडलूम खरेदीवर कांदे मोफत; दुकानदाराची अफलातून ऑफर
ठाणे रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्यांची वाहने उभी करता यावी यासाठी स्थानकाच्या पश्चिमेला दुमजली वाहनतळ तयार करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता. या कामासाठी सुमारे १७ कोटी रुपयांचा निधीही मंजूर झाला होता. २०१५ पासून तीन वर्षे हे काम विविध कारणांमुळे रखडले होते. या कामासाठी तरतूद केलेला निधीही संपला होता आणि अखेर नव्याने निधी मिळाल्यानंतर दीड वर्षांपूर्वी वाहनतळ उभारण्याचे काम पूर्ण करण्यात आले. या वाहनतळातील तळमजल्याचे कंत्राट खासगी कंपनीला देण्यात आले होते. सहा महिन्यांपूर्वी रेल्वे प्रशासनाने पहिल्या मजल्याचे कामही वेगाने पूर्ण केले. त्यामुळे ठाणे स्थानक परिसरातील पार्किंगची खूप मोठी समस्या सुटेल, अशी चिन्हे निर्माण झाली होती. मात्र, या पहिल्या मजल्यावरील वाहनतळाच्या कंत्राटासाठी रेल्वे प्रशासनाने वार्षिक १ कोटी रुपयांची निविदा काढली होती. या निविदेसाठी एकही कंत्राटदार पुढे येत नव्हता. त्यामुळे वाहन चालकांची गैरसोय होऊ लागल्याने अखेर मध्य रेल्वे प्रशासनाने पहिल्या मजल्यावरील वाहनतळ विनाशुल्क खुले करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता बेकायदा पार्किंगला आळा बसण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - कोंडी व वाढत्या अपघातांच्या निषेधार्थ मुंब्रा बायपासवर राष्ट्रवादीचा रास्ता रोको