ठाणे : पावसाळा तोंडावर आला असून, महापालिकेच्या वतीने पावसाळ्यापूर्वीची कामे चालू आहेत. त्यातच नालेसफाईचा पाहणी दौरा ठाणे पालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी इतर अधिकाऱ्यांसोबत केला होता. यावेळी 80% नालेसफाई झाली असल्याचे आयुक्तांनी सांगितले होते. परंतु, ही नालेसफाई झालीच नसल्याने त्याच्या निषेधार्थ मनसेच्या वतीने आज ठाण्यातील नळपाडा येथील नाल्यात उतरून क्रिकेट खेळत आंदोलन करण्यात आले.
मान्सूनपूर्व कामे रखडली : ठाण्यात पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे सुरू आहेत. परंतु, ही नालेसफाई झाली नसल्याने मनसेच्या कार्यकर्त्यानी ठाण्यातील नलपाडा येथील नाल्यात आंदोलन केले. पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचे काम पूर्ण झाले पाहिजे होते. परंतु, जून महिना आला असूनदेखील हे काम न झाल्याने नलपाडा येथील 25 ते 30 हजार नागरिकांना मोठ्या प्रमाणात याचा त्रास सहन करावा लागणार आहे.
ठाणे महापालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : ठाणे शहरात काही सखल भागात सेक्शन पंप लावलेले आहेत. परंतु, नालेसफाई योग्य झाली तर अशा सेक्शन पंपांची गरजच लागणार नाही व योग्य नालेसफाईमुळे पाण्याचा निचरादेखील योग्य प्रमाणात होईल. महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी ठाण्यातील नालेसफाईचा दौरा केला, परंतु आयुक्तांच्या खालील अधिकारी हे आयुक्तांची फसवणूक करीत त्यांच्या डोळ्यांत धूळ फेकत असल्याचा आरोप यावेळी मनसेचे स्वप्नील महिंद्रकर यांनी केला. तर नालेसफाई न झाल्यामुळे चक्क नाल्यात उतरून क्रिकेट खेळत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी नालेसफाई न झाल्याने महापालिकेचे लक्ष वेधले.
प्रशासनाकडून खोटी माहिती : मे महिन्याच्या सुरुवातीलाच प्रशासनाच्या वतीने ठाण्यातल्या विविध परिसरामध्ये दौरे करून नालेसफाईच्या कामाचा आढावादेखील घेण्यात आला आणि या वेळेस 50% नालेसफाई तेव्हा झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, आजही परिस्थिती अनेक ठिकाणी गंभीर आहे. नालेसफाईचे कामदेखील सुरू झालेले नाही हे वास्तव मनसेने उघड केलेले आहे. या वास्तवामुळे प्रशासनाने केलेल्या कामाचे दावे हेदेखील फोल असल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा : मुंबईतील मान्सूनपूर्व तयारीची कामे वेळेत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश