ठाणे - आज संध्याकाळी 8 वाजेपासून सोमवारी सकाळपर्यंत ठाण्यात पूर्ण लॉकडाऊन असणार आहे. त्यासाठी ठाणे पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हॉलतिकीट शिवाय परीक्षार्थी दिसल्यास त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे. तसेच मॉर्निंग वॉक आणि विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर देखील कठोर कारवाई होणार असल्याचा इशारा ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिला आहे.
आठवडाभर ठाणे जिल्ह्यात दिवसातून काही तासच संचारबंदी होती. तसेच खासगी वाहनांना बाहेर पडण्यास मुभा होती. मात्र पुढील दोन दिवस ठाण्यात कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या दिवशी विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच जे परीक्षार्थी विद्यार्थी आहेत त्यांनी हॉलतिकीट जवळ बाळगणे गरजेचे आहे, अन्यथा त्यांनाही कारवाईला सामोरं जावं लागणार आहे. त्याचप्रमाणे खासगी वाहनांना देखील संचारबंदी लागू करण्यात आली आहे, योग्य कारणाशिवाय रस्त्यावर खासगी वाहन दिसले, तर ते वाहन जप्त करण्यात येणार आहे.
'नियम मोडल्यास कडक कारवाई'
मॉर्निंग वॉक, इव्हिनिंग वॉक किंवा कोणत्याही कारणाशिवाय रस्त्यावर फिरताना जर कोणी दिसले तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असं ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी स्पष्ट केले आहे. शिवाय विनाकारण घराबाहेर पडू नये असं त्यांनी नागरिकांना आवाहन देखील केले आहे. या काळात जिवनावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे
ठाणेकर सुज्ञ असून सर्व नियमांचे पालन करतील, पण जर कोणी नियमांचे उल्लंघन केलं तर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस अत्यावश्यक कारणाशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये, आपल्या कुटुंबांसोबत वेळ घालवावा, पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन देखील यावेळी फणसाकळर यांनी केले आहे.
हेही वाचा - ठाण्यात सोनारांनी विकल्या भाज्या; बाजारपेठेत अनोखे आंदोलन