मीरा भाईंदर - मराठी भाषेच्या वापरासाठी महाराष्ट्र शासनाने अनेक वेळा परिपत्रक काढूनसुद्धा त्याला हरताळ फासण्याचे काम पोलीस प्रशासन करत असल्याची तक्रार मराठी एकीकरण समितीने गृहमंत्र्यांकडे केली आहे. मीरा भाईंदर शहरात वाहतूक विभागाकडून जाहिरातबाजी करण्यात आली आहे. ती पूर्णपणे हिंदी भाषेत केल्याने राजभाषेचा अपमान होत असल्याचा आरोप मराठी एकीकरण समितीने केला आहे.
'मराठी राजभाषेचा अपमान'
पत्रकार, पोलीस असे स्टिकर लावणाऱ्या वाहनांवर कारवाईच्या आदेशाची उलटसुलट चर्चा शहरात सुरू असतानाच आता वाहतूक पोलिसांनी रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत शहरात मराठी भाषेला डावलत हिंदी भाषेत बॅनरबाजी केल्याची चर्चा जोरात सुरू आहे. पोलिसांच्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत शहरात सर्वत्र हिंदी भाषेत बॅनर लावण्यात आले आहेत. त्याला जोरदार आक्षेप घेत मराठी एकीकरण समितीचे शहर अध्यक्ष सचिन घरत यांनी राज्याचे गृहमंत्री तसेच मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे.
'लेखी आदेश असतानाही उल्लंघन'
तक्रारीत लिहिले आहे, की मीरा भाईंदर शहरात वाहतूक पोलिसांमार्फत मराठी राज्यभाषा अधिनियम १९६४नुसार १००% मराठी कारभार नियमाचे उल्लंघन होताना दिसत आहे, संपूर्ण शहरात रस्ता सुरक्षा अभियानाचे फलक हिंदी भाषेत लावले गेले आहेत. शासनाने अनेकवेळा यासंबंधी परिपत्रक काढून पुन्हा पुन्हा सूचना दिल्या आहेत. तसेच राज्य पोलीस महानिरीक्षक यांनी २०१८मध्ये लेखी आदेश काढले असतानासुद्धा अनेक ठिकाणी नियमाचे उल्लंघन करून दुसरी तिसरी भाषा वापरून एक भाषिक राज्य बहुभाषिक होते की काय, अशी शंका येण्यासारखे काम करत आहेत.
'भाषेचे नियमसुद्धा पाळले जावेत'
स्थानिक पोलीस ठाण्यात याबाबत कळवले आहे. आता हे फलक काढण्याची कृती केली जाते, की नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे. जसे वाहतूक आणि इतर नियम आहेत तसेच भाषेचे नियमसुद्धा आहेत. तेसुद्धा पाळले गेलेच पाहिजेत, अशा भावना सचिन घरत यांनी व्यक्त केल्या आहेत.