ठाणे - ठाण्याचे हृदय म्हणून ओळख असलेल्या मासुंदा तलावात बोटींगची सफारी सुरू झाली आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंन्सिगचे सर्व नियम पाळून ठाणे पालिकेने बोटींगला परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे नौकाविहारासाठी कोणत्याही शुल्काची वाढ करण्यात आली नाही. त्यामुळे ठाणेकरांचीच नव्हे तर, मुंबईतील पर्यटकांची पावलेही नौकाविहाराचा आनंद लुटण्यासाठी मासुंदा तलावाकडे वळू लागली आहेत. यामुळे खऱ्या अर्थाने ठाण्याच्या हृदयाची ‘धडधड’ सुरू झाली आहे, असे म्हणता येईल.
हेही वाचा - पालिकेने माणुसकी जपली, हॉटेलचे भाडे न परवडणाऱ्या ४५० प्रवाशांना केले मोफत क्वारंटाइन
तलावांचे शहर म्हणून ठाण्याची ओळख आहे. तर, ठाणेकरांची चौपाटी असलेले मासुंदा तलाव म्हणजे शहराचे हृदयच. दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी, सायंकाळचा निवांत क्षण अनुभवण्यासाठी अनेकजण सहकुटुंब, मित्रपरिवारासह येथे येतात. भेळपुरीचे स्टॉल, घोडागाडीची सफर आणि नौकाविहार म्हणजे या चौपाटीचा विरंगुळा. मात्र, गेल्या आठ- नऊ महिन्यांपासून कोविडच्या पार्श्वभूमीवर येथील नौकाविहार बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे येथील बोटींग व्यवसाय ऐन पर्यटनाच्या हंगामात बुडाला. पण आता कोविडचे संकट दूर होऊ लागल्याने पुन्हा नवीन जोमाने बोटींग व्यवसायाला सुरुवात झाली आहे. सॅनिटायझेशन आणि सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे नियम पाळले जात असल्याने बोटींगचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकही येथे हजेरी लावत आहेत.
- मोठया पॅसेंजर बोटसाठी एका फेरीला प्रतिमाणशी २५ रुपये तिकिटाचा दर पूर्वी होता. आताही तोच दर आहे.
- फॅमिली बोटसाठी प्रति अर्धा तास १८० रुपये आकारले जात आहेत. तर, कपल बोटसाठी प्रत्येकी ७० रुपयांचा तिकीट दर आहे.
- तिकीट दरात कोणतीही वाढ करण्यात आली नसून सायंकाळी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत पर्यटकांना नौकाविहाराचा आनंद लुटता येणार आहे.
बोटींग व्यवसाय तारण्यास मदत
मासुंदा तलावत १० छोट्या फॅमिली बोट असून १५ मोठ्या पॅसेंजर बोटी आहेत. पॅसेंजर बोटमध्ये एका वेळेला २५ जणांना तलावाची सफर घडवली जाते. मात्र, कोविडच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी आता एका पॅसेंजर बोटमध्ये १५ जणांनाच बसवण्यात येत आहे. त्यातही सायंकाळी चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत बोटींग करण्यासाठी पालिकेने परवानगी दिली आहे. त्यामुळे पूर्वी जिथे ५० ते ५५ फेऱ्या दिवसभरात होत होत्या, तिथे आता २५ फेऱ्या होत आहेत. त्यामुळे थोडा धंदा आणि नफा कमी झाला असला तरी व्यवसाय तारण्यासाठी हेही नसे थोडके, असे फिशरिज फिशिंग बोटचे मालक प्रेम दाभाडे यांनी सांगितले.
हेही वाचा - कौतुकास्पद..! 70 दिव्यांग तरुणांनी सर केले कळसुबाई शिखर