ठाणे- तुमच्या घरावर कोणीतरी करणी केली असून ती दूर करतो सांगत महिलेची ७६ लाख ३८ हजार ८३८ रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात जादूटोणा कायद्यासह आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुरजीन असे गुन्हा दाखल झालेल्या भामट्याचे नाव आहे.
अंबरनाथ पश्चिम परिसरात सदर आर्थिक फसवणूक झालेली महिला राहते. याच परिसरात आरोपी भुरजीन राहत असल्याने त्या दोघांची ओळख झाली होती. आरोपी भुरजीनने त्या महिलेला कोणीतरी तुमच्यावर व तुमच्या घरावर काळी जादू केली असल्याचे भासवले. तसेच, माझ्या ओळखीचा एक मांत्रिक आहे. त्याला अतिंद्रीय शक्ती आत्मसात असल्याचे भासवत तो तुमच्यावरील करणी दूर करेल, असे सांगितले. महिलेचा विश्वास संपादन करून आरोपी भुरजिन याने त्या महिलेकडून ऑक्टोबर २०१५पासून जुलै २०१९ पर्यंत महिलेच्या खात्यातून ५ वर्षांत जवळपास ७६ लाख ३८ हजार ८३८ रूपये स्वत:च्या खात्यात वळते केले. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात महिलेने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी भुरजीन याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.