ठाणे - कोरोना रुग्णांची महापालिका थट्टा करत असून त्यांच्याशी क्रूरपणे वागत असल्याची टीका भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. ठाण्यातील दोन्ही कॅबिनेट मंत्री सत्तेत मश्गूल असल्याचा टोला त्यांनी लगावलाय.
वैद्यकीय कर्मचाऱ्यांची व्यवस्था पुरेशी नसताना 1000 बेड्सचे हॉस्पिटल सुरू करण्याचा अट्टाहास का केला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच कोरोनाबाधित कुटुंबीयांच्या भावनांशी खेळणाऱ्या हॉस्पिटल व्यवस्थापनावर कठोर कारवाईची मागणी केली.
ग्लोबल हब येथील रुग्णालयात एका व्यक्तीचा मृतदेह दुसऱ्याच रुग्णाच्या कुटुंबीयांना देण्यात आला होता. तसेच उपचार देखील मृत व्यक्तीला असलेल्या व्याधिंवरच होत होते. या गलथान कारभाराच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रभारी किरीट सोमय्या व आमदार निरंजन डावखरे यांनी पीडित कुटुंबीयांसह महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांची भेट घेतली.
अशोक, बबन आणि नागेश...रुग्णालय प्रशासनाचा घोळ!
ठाणे महापालिकेने कोरोनाच्या रुग्णांची क्रूर चेष्टा चालवली आहे. अशोक (बदलेले नाव) यांचा मृतदेह बबन यांच्या कुटुंबीयांना दिल्याचा प्रकार झाला होता. काल रात्री अशोक यांच्या कुटुंबीयांनी बबन यांची रुग्णालयात भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने पीपीई किट घालून अशोकच्या कुटुंबीयांना बबन यांच्याजवळ रात्री ११ वाजता नेले होते. प्रत्यक्षात मात्र त्यांचा मृत्यू नऊ वाजून ४० मिनिटांनी झाला होता.
बबन यांच्यावर नागेश म्हणून उपचार सुरू होते. तर खुद्द नागेश हे रुग्ण दुसऱ्या मजल्यावर नॉन आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत. एकाच नावाने दोन रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा प्रकार म्हणजे बेजबाबदारपणाचा कळस आहे, असा आरोप किरीट सोमय्या व निरंजन डावखरे यांनी केला. मृतदेह अदलाबदली संदर्भात दोन्ही बाजू जबाबदार असल्याचा बॉण्ड रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने बबन यांच्या कुटुंबीयांकडून लिहून घेतला. हा क्रूरपणा असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.
कर्मचारी नसताना देखील १००० बेड्सची व्यवस्था कशाला?
ग्लोबल रुग्णालयात केवळ २०० रुग्णांची देखभाल करता येईल, एवढेच कर्मचारी उपलब्ध असल्याचे रुग्णालय व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. मग १००० बेडचे रुग्णालय उभारण्याचा अट्टाहास का केला? असा प्रश्न सोमय्यांनी विचारलाय.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच अधिष्ठाता डॉ. योगेश शर्मा यांची हकालपट्टी करण्याची मागणी केलीय. विशेष कोरोना रुग्णालयात एवढा भयंकर प्रकार घडूनही शहरातील दोन्ही कॅबिनेट मंत्री सत्तेत मश्गूल आहेत, असे सोमय्या म्हणाले. दोन्ही मंत्र्यांनी कुटुंबीयांची भेट घेतलेली नाही. तसेच व्यवस्थापनाशी चर्चाही केली नाही, ही दुर्दैवाची बाब आहे, डावखरे म्हणाले.
कुटुंबीयांमध्ये संताप
यापुढील काळात नातेवाईकांनी मृत व्यक्तीची ओळख पटवल्यानंतरच रुग्णालय प्रशासनाने कार्यवाही करावी. तसेच नातेवाईकांना आणल्याशिवाय अंत्यसंस्कार करू नयेत, अशी मागणी भाजपाने केली. त्याला आयुक्तांनी मंजुरी दिलीय. या हलगार्जिपणामुळे पीडितांच्या नातेवाईकामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असून त्यांनी आज भाजपा नेते भेटण्यासाटी आल्यावर रुग्णालय प्रशासनाचा निषेध केला.