ठाणे - महाराष्ट्रात सध्या कायद्याचे राज्य नसून गुंडाराज फोफावल्याने महिला दहशतीखाली जगत आहेत, अशी गंभीर टीका भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे. चित्रा वाघ यांनी ठाणे महानगरपालिकेच्या मानपाडा माजिवडा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांची आज रुग्णालयात भेट घेऊन त्यांनी विचारपूस केली.
दोन दिवसांपूर्वी कल्पिता पिंपळे या कासारवडवली बाजारात एका अनधिकृत फेरीवाल्यावर कारवाई करत असताना या माथेफिरू फेरीवाल्याने धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला चढवला होता. हा हल्ला एवढा भयानक होता की, त्यात पिंपळे यांच्या हाताची दोन आणि त्यांच्या अंगरक्षकाच्या हाताचे एक बोट तुटून खाली पडले. चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारला धारेवर धरत महाराष्ट्रात सरकार नावाची चीज आहे का? असा सवाल केला.
महाराष्ट्रात व्यावसायिक, प्रशासकीय महिला अधिकारी देखील सुरक्षित नाहीत. त्यामळे येथे गुंडाराज असल्याचे त्या म्हणाल्या. फडणवीस सरकारच्या काळात फेरीवाले धोरण राबवले जात होते. परंतु आता ते राबवले जात नाही ते राबवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. दोघेही लवकरात लवकर बरे होऊ देत यासाठी त्यांनी शुभेच्या दिल्या.