ठाणे - भिवंडीच्या कोव्हिड सेंटरमधून पसार झालेल्या आरोपीला 7 महिन्यानंतर अटक करण्यास डोंबिवली मानपाडा पोलिसांना यश आले आहे. राजकुमार कृष्णा बिंद (30) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपी हा मुळचा उत्तरप्रदेश राज्यातील मिर्जापूर गावचा रहिवाशी आहे. हा आरोपी सध्या कल्याण-शिळ मार्गावरील गोळवली गावातील पांडुरंग चाळीत राहणारा आहे.
हेही वाचा-NCP Slams PM : 'गंगाने बुलाया है' म्हणणार्या पंतप्रधानांनी अजून गंगा स्वच्छ केली नाही - नवाब मलिक
आरोपी कोव्हिड सेंटरमधून पळाला होता...
डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी मे महिन्यात राजकुमार बिंद याला एका चोरीच्या प्रकरणात अटक केली होती. अटक केल्यानंतर त्याची कोविड चाचणी करण्यात आली. या चाचणीत राजकुमारचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. राजकुमारला उपचारासाठी कल्याण भिवंडी रोडवर असलेल्या टाटा आमंत्रा कोव्हिड सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. राजकुमारवर नजर ठेवण्यासाठी कोव्हिड सेंटरमध्ये मानपाडा पोलीस ठाण्याचे दोन पोलीस कर्मचारी तैनात ठेवण्यात आले होते. मात्र, 10 मे रोजी राजकुमार या दोन्ही कर्मचाऱ्यांना चकवा देत संधी साधून पळून गेला होता. या प्रकरणी भिवंडी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तसेच यावेळी ड्युटीवर तैनात आलेल्या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू होती. गेल्या 7 महिन्यांपासून राजकुमार पोलिसांच्या हाती लागत नव्हता.
हेही वाचा-विशेष संवाद : अमेरिकेतील डॉ. रवी गोडसेंनी केलं बुस्टर डोसचं समर्थन
मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात-
कल्याणचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ ( Kalyan Deputy police commissioner Sachin Gunjal ), डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे ( PI Shekhar Bagade ) यांनी राजकुमारचा शोध घेण्यासाठी एक पथक नेमले. सहायक पोलीस निरीक्षक अविनाश वणवे यांच्या पथकाने उत्तरप्रदेशच्या मिरजापूर येथील राहणारा राजकुमार याच्या मोबाईल लोकेशनचे ट्रॅक करण्याचे काम सुरू केले. वारंवार त्याचे लोकेशन बदलत होते. अखेर 10 सप्टेंबर रोजी राजकुमार याचा फोन दादरा हवेली सिल्वासा येथे ट्रेस झाला. पोलिसांचे पथक त्या ठिकाणी पोहचले. राजकुमार हा एका कंपनीत काम करत होता. अखेर त्याला अटक करण्यात आली.