ठाणे - भारतीय चलनातील ११ लाख ४९ हजारांच्या बनावट नोटांसह चौघांना खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. भारतीय चलनातील बनावट नोटा घेऊन मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत संशयित आरोपी येणार असल्याची माहिती खबऱ्याकडून पोलिसांना मिळाली होती. यानंतर ठाणे शहर खंडणी विरोधी पथकाने दत्त पेट्रोलपंप येथे सापळा रचून चार आरोपींना २००, ५०० आणि २ हजार रुपयांच्या ११ लाख ४९ हजार रुपयांच्या बनावट नोटांसह ७ विविध कंपनीचे मोबाईल पोलीस पथकाने हस्तगत केले आहेत.
आरोपींची नावे खालीलप्रमाणे -
मुजम्मील मोहोम्मद साल्हे सुर्वे (वय ४०, रा. ग्रीनपार्क बिल्डिंग, अमृतनगर, मुंब्रा), मुजफ्फर शौकत पावसकर ( वय ४१, रा. त्रिभुवन चाळ, चिमाट पाडा, मरोळनाका, अंधेरी पूर्व), प्रवीण देवजी परमार (वय ४३. रा. तानाजी नगर, साकीनाका, पूर्व मुंबई), नसरीन इम्तियाज काझी (वय ४१, रा. वसीम बिल्डिंग, बॉम्बे कॉलनी, मुंब्रा) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
११ लाख ४९ हजारांच्या बनावट नोटा जप्त
अटक केलेल्या आरोपींकडे २००, ५०० आणि २ हजार रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या. पोलिसांनी त्या जप्त केल्या आहेत. ११ लाख ४९ हजारांच्या या नोटामध्ये २०० रुपयांच्या १५ नोटा, ५०० रुपयांच्या ९४८ नोटा, २ हजार रुपयांच्या ३३६ नोटा असा एकूण ११ लाख ४९ हजार रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत. आरोपींविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीना अटक केली आहे.
स्कॅनर प्रिंटरची घेतली होती मदत
आरोपींच्या चौकशीत सदरच्या बनावट नोटा आरोपी प्रवीण देवाजी परमार आणि मुजफर पावसकर यांच्या स्कॅनर प्रिंटरच्या सहाय्याने जेके बॉण्ड पेपरचा वापर करून छपाई केली होती. त्या बनावट नोटा मुंब्रा, ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई परिसरात वटवण्यासाठी आणल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली.
हेही वाचा - विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यात रंगीत फुलांची फळांची आरास
हेही वाचा - एकेकाळी बालविवाह झालेल्या वृद्ध दाम्पत्याचा पुनर्विवाह सोहळा