सोलापूर - पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी अवैध धंद्यावर अंकुश आणण्यासाठी वेगवेगळी पथक तैनात केली आहेत. शहरालगतच्या ग्रामीण भागात हे पथक कारवाया करत आहेत. गुरूवारी दुपारी एसपीचे विशेष पथक मुळेगाव येथील पारधी वस्ती येथे सुरू असलेल्या अवैध गॅस धंद्यावर कारवाईस गेले होते. त्याठिकाणी राहत असलेल्या दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी कारवाईसाठी आलेल्या पोलिसांसोबत वाद करत, त्यांच्यावर हल्ला केला. तसेच पोलिसांकडून मोबाईल काढून घेतले. या घटनेची दखल घेत तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप आपल्या फौजफाट्यासह गेले. त्यानंतर त्या दोन्ही महिलांंनी धिंगाणा केला आणि विषारी गोळी खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याबाबत चार जणांविरोधात तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचा - भिवंडीत अग्नितांडव; रसायनाच्या कारखान्याला भीषण आग
गुरुवारी दुपारी एसपी तेजस्वी सातपुते यांचे विशेष पथक मुळेगाव तांडा येथे अवैधरित्या सुरू असलेल्या गॅस पॉईंटवर कारवाईसाठी गेले. या गॅस पॉईंटवर घरगुती गॅसचा उपयोग इंधन म्हणून वाहनात भरण्याचे अवैध काम चालत होते. विनायक शाम काळे हा व्यवसाय चालक आहे. या कारवाई वेळी पूनम काळे व रामेश्वरी काळे यांनी कारवाईस विरोध केला आणि गोंधळ करण्यास सुरुवात केली. कारवाईसाठी आलेल्या विशेष पथकातील पोलिसांनी मोबाईलमध्ये शूटिंग घेण्याचा प्रयत्न केला. परंतु या दोघींनी पोलिसांचा मोबाईल काढून घेतला आणि पोलिसांवर हल्ला करत त्यांना परत पाठविले.
महिला पोलिसांनी पोलिसांवर हल्ला करून मोबाईल काढून घेतले
विनायक काळे याची एक बहीण पूनम काळे व वहिनी रामेश्वरी काळे या दोन्ही पोलीस दलात कॉन्स्टेबल या पदावर कार्यरत आहेत. पूनम काळे ही सोलापूर शहर पोलीस दलात कार्यरत आहे तर वाहिनी रामेश्वरी काळे ही ग्रामीण पोलीस दलात कार्यरत आहे. कारवाईसाठी आलेल्या विशेष पोलीस पथकावर हल्ला करून त्यांचे मोबाईल काढून घेतले आणि परत पाठविले.
दोन्ही महिला पोलिसांचा गोंधळ आणि विष प्राशन
कारवाईसाठी आलेल्या विशेष पोलीस पथकावर हल्ला करून त्यांचे मोबाईल काढून घेत त्यांना परत पाठविले. ही बाब तालुका पोलीस ठाण्याला माहिती होताच ते महिला कॉन्स्टेबलला सोबत घेऊन घटनास्थळी गेले. यावेळी तालुका पोलीस ठाण्याच्या पोलिसांसोबत देखील रामेश्वरी काळे आणि पूनम काळे या महिला पोलिसांनी गोंधळ घालत विष घेतले. गोंधळ करत असताना पूनम काळे चक्कर येऊन खाली पडली. पोलिसांनी ताबडतोब दोघींना सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.
चार संशयीत आरोपींना ताब्यात घेत गुन्हे दाखल
तालुका पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी विनायक शाम काळे, शीला विनायक काळे, पूनम काळे व रामेश्वरी काळे या चौघांना अटक केली आहे. चौघांवर अवैध गॅस धंदा केल्याचा गुन्हा दाखल केला. तसेच सरकारी कामात अडथळा, पोलिसांवर हल्ला आणि पूनम व रामेश्वरी यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला,असे विविध गुन्हे दाखल केले आहेत.
हेही वाचा - नियम नसूनही पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांना सॅनिटायझर, मास्क विकत घेण्याची सक्ती