सोलापूर - कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत सोलापुरात भयंकर रक्त तुटवडा निर्माण झाला आहे. आता रेमडेसिविर इंजेक्शनच्या तुटवड्यासोबत रक्त तुटवड्याचा सामना करावा लागणार आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात फक्त एक आठवडा रक्त पुरेल इतक्याच रक्ताच्या बॅग शिल्लक असल्याची धक्कादायक माहिती गोपाबाई दमानी ब्लड बँकेच्या प्रशाकीय अधिकाऱ्यांनी दिली. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असलेल्या रक्तपेढीत रक्ताचा बॅगा शिल्लक नाहीत. सोलापुरातील खासगी व सरकारी रुग्णालये कोरोना रुग्णांनी खचाखच भरले आहेत. या रुग्णांना रक्ताची गरज पडल्यास भयंकर अशी परिस्थिती निर्माण होणार आहे.
कोविड लसीकरणाचा देखील परिणाम-
कोविड लसीकरण मोहिमेचा देखील रक्त संकलनावर फरक पडला आहे. कारण सरकार तर्फे एक जनजागृती केली जात आहे. लसीकरण केलेल्या नागरिकांनी 1 ते 2 महिन्यापर्यंत रक्तदान करू नये. पण याचे परिणाम रक्तसाठ्यावर होत आहे.दर महिन्याला तीन हजार ते चार हजार रक्ताचे बॅग लागतात. पण सध्या एक हजार बॅगच शिल्लक आहेत. अत्यावश्यक असलेल्या रुग्णांसाठी एक आठवड्यानंतर रक्त मिळणार नाही.
सर्व प्रकारच्या रुग्णांना रक्ताची गरज-
सध्या कोविड रुग्णांचा विचार केला जात आहे. पण रक्त हे सर्व प्रकारच्या रुग्णांना लागत आहे. त्यामध्ये अपघात, प्रसूती आदी रुग्णांना रक्ताची गरज पडत आहे. सर्व रुग्णांना रक्त उपलब्ध करून द्यावयाचा असल्यास दररोज शंभर जणांनी रक्तदान करणे आवश्यक आहे.
हेही वाचा - राज्यातील आणखी चार मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल - किरीट सोमौया
थैलेसिमिया रुग्णांना दर महिन्याला रक्ताची गरज-
दमानी ब्लड बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोलापुरात मोठ्या प्रमाणात थैलेसिमिया रुग्णांची संख्या आहे. या रुग्णांना दर महिन्याला मोठ्या प्रमाणात बाहेरून रक्त पुरवठा करावा लागतो. त्यांना वेळेवर रक्तपुरवठा न केल्यास त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे.तसेच अपघात, प्रसूती,थैलेसिमिया या रुग्णांना रक्त पुरवठा करायचा का कोविड रुग्णांना रक्त पूरवठा करायचा असा पेच शहर आणि जिल्ह्यातील ब्लड बँकासमोर पडला आहे.
सोलापुरातील सर्व रक्तपेढीत रक्त तुटवडा-
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात 16 रक्तपेढ्या आहेत.यामध्ये दमानी ब्लड बँक,हेडगेवार रक्तपेढी, अतहर ब्लडबँक, बोलली ब्लड बँक, सिद्धेश्वर ब्लड बँक,आशविनी ब्लड बँक, अक्षय रक्तपेढी, पंढरपूर येथील तीन रक्तपेढी, बार्शी येथे चार रक्तपेढी,सांगोला एक रक्तपेढी, अकलूज येथे एक रक्तपेढी या सर्व ब्लड बँकेत रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. वेळेत मुबलक रक्तसाठा उपलब्ध न झाल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे.
हेही वाचा - सचिन वाझे प्रकरणात दोन हजार कोटींपेक्षा अधिक वसुली - किरीट सोमैया