सोलापूर - कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे. पण, आजही प्रशासनाच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात सर्व्हे आणि तपासणी सुरुच आहे. सोलापूर शहरात हळूहळू रुग्णांची संख्या कमी होत चालली आहे. सोलापूर शहर अनलॉक झाले असून सर्व व्यवहार सुरळीत आहेत. पण, आरोग्य प्रशासन वेगवेगळ्या शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांकडून कोरोनाची सर्व कामे करुन घेत आहेत. कोरोना महामारी संपली असे सर्व नागरिकांना वाटत आहे. पण, आजही कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. अनेक शिक्षक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका कोरोना ड्युटी बजावत आहेत. सोलापूर शहरात मुस्लिम शिक्षण संस्था म्हणून ओळख असलेल्या सोशल उर्दू प्राथमिक शाळेत सोमवारी (दि. 21 जून) सकाळी मोठी घटना घडली आहे. शिक्षक पत्नीला नेहमीच कोरोना ड्युटी का लावली जाते, असा जाब विचारत सद्दाम जकीर नाईकवाडी याने मुख्याध्यापक असिफ इकबाल यांना मारहाण केली.
मारहाण करण्यापूर्वी संशयिताने सीसीटीव्ही कॅमेरे केले बंद
सोमवारी (दि. 21 जून) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही मारहाण झाली आहे. माझी मुलगी लहान आहे, माझ्या पत्नीला कोरोना ड्युटीमधून मुक्त करा, अशी मागणी करत सद्दाम नाईकवाडी याने मुख्याध्यापक असिफ इकबाल यांना बेल्टने मारहाण केली. मारहाण होताना इतर शिक्षकांनी ताबडतोब मध्यस्थी करून मुख्याध्यापकास सोडविले. त्यानंतर पोलिसांना माहिती कळविली. संशयीत आरोपीने मारहाण करण्यापूर्वी सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले होते.
जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
जेलरोड पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंदणीचे काम सुरू आहे. जखमी मुख्याध्यापक असिफ इकबाल यांच्यावर शासकिय रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले असून त्यांच्या हाताला, पाठीत, पोटात जबर मार लागला आहे. एका शिक्षिकेच्या पतीने शाळेत येऊन मुख्याध्यापकास मारहाण केल्याने सोलापूर शहरात चर्चेला उत आले होते.
हेही वाचा - काँग्रेसकडून कृषी वीज बिलांची होळी करण्याचा प्रयत्न; पोलिसांसोबत झटापट