सोलापूर - आषाढी वारीच्या निमित्ताने वाखरीच्या विश्वशांती गुरुकुलात जंगी सोंगी भारुडांचा कार्यक्रम पार पडला. राज्यभरातून आलेल्या दिंड्यामधून निवडक दिंड्यांनी आपली आध्यात्मिक कला या सोहळ्यात सादर केली. यावेळी वारकऱ्यांसह वारीसाठी पंढरपूरला आलेल्या नागरिकांनीही भारुडांचा आनंद लुटला.
सध्या पंढरपूर नगरी हरिजागरानात दुमदुमली आहे. दिवसभराच्या पायी प्रवासांनंतर सोंगी भारुड हे वारकऱ्यांच्या मनोरंजनाचे माध्यम आहे. या अध्यात्मिक कलेला चालना देण्यासाठी डॉ. विश्वनाथ कराड दरवर्षी वाखरीच्या एमआयटी अर्थात विश्वशांती गुरुकुलात भारुडाचा कार्यक्रम घेतात. याहीवर्षी ही हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महाराष्ट्रात गाजलेल्या सोंगी भारुडकारांनी विनोदी चिमटे काढत उपस्थित वारकरी आणि प्रेक्षकांचे प्रबोधनपर मनोरंजन केले.
लोकाभिमुखता हे वारकरी संप्रदायाचे सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. संत एकनाथांनी एकनाथी भगवंताच्या पलीकडे जाऊन भारुडा सारख्या कथात्मक लोककाव्यांची निर्मिती केली. पारमार्थिक विचार जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी नाथांनी डोंबारी, भुत्या, वाघ्या, कोल्हाटी, चोपदार, कुंटींन, वंजारीन या वंचित वर्गाचे मनोरंजन करत त्यांना अध्यात्माची गोडी लावली. त्यासाठी त्यांनी विनोदी दाखल्याची त्याकाळी केलेली पेरणी आजही अवीट आहे, हे मात्र नक्की.