सोलापूर - कोरोना महामारीच्या काळात संकटांचा डोंगर सोलापूर शहर आणि जिल्ह्यावर कोसळला आहे. 2021 या वर्षात सोलापूर शहरातील 859 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 2021 वर्ष अपघात आणि आंदोलनामुळे अविस्मरणीय ठरले आहे. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य प्रशासनावर भयंकर असे ताण पडले होते.
जुलै महिन्यात मराठा आरक्षणावरून मराठा आंदोलन देखील झाले. पोलिसांनी परवानगी नाकारली असताना देखील मराठा समाज बांधवानी आरक्षणासाठी सोलापुरातील संभाजी महाराज पुतळा येथील मुख्य चौकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला होता. 2021 या सरत्या वर्षाचा आढावा घेतला असता, कोरोना महामारीची दुसरी लाट, आंदोलने आणि अपघात याची आठवण होते.
- कोरोना विषाणूची लागण होऊन 859 नागरिकांचा मृत्यू : सोलापूर शहर महानगरपालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर शहरात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत भयंकर अशी परिस्थिती निर्माण झाली होती. शहरातील 859 जणांना कोरोनाची लागण होऊन आपले प्राण गमवावे लागले. मार्च 2020 ते नोव्हेंबर 2021 पर्यंत सोलापूर शहरातील 1 हजार 457 नागरिकांचा कोरोना विषाणूची लागण होऊन मृत्यू झाला आहे.
- नऊशे वर्षांची परंपरा असलेली ग्रामदैवत सिद्धेश्वर महायात्रा रद्द : सोलापूरचे ग्रामदैवत म्हणून सिद्धेश्वर महाराजांची राज्यभरात एक विशेष ओळख आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यात मकर संक्रांतीला सोलापुरात सिद्धेश्वर महायात्रा आयोजित केली जाते. परंतु, कोरोना महामारीच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे 2021 मध्ये सोलापुरातील सिद्धेश्वर महायात्रा रद्द करावी लागली. या महायात्रेला सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील, तसेच आजूबाजूच्या दोन राज्यांतील नागरिक मोठ्या संख्येने दाखल होतात व मोठी गर्दी निर्माण होते. गर्दीमुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढेल म्हणून स्थानिक प्रशासनाने ही महायात्रा रद्द केली.
- सोलापूरच्या चार हुतात्म्यांचे पोस्ट तिकिटाचे अनावरण : भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या सोलापुरातील चार हुतात्म्यांच्या सन्मानार्थ भारत सरकारच्या केंद्रीय संचार मंत्रालयाच्या वतीने हुतात्मा दिनाचे औचित्य साधून 12 जानेवारी रोजी हुतात्मा मलप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, श्रीकिसन सारडा, अब्दुल रसूल कुर्बान हुसेन यांच्यावरील पोस्टाच्या तिकिटाचे अनावरण करण्यात आले. हा दिवस सोलापूरच्या इतिहासात सोनेरी दिवस म्हणून नोंद झाला आहे.
- कोरोना महामारीची तिसरी लाट रोखण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सोलापूर शहर आणि जिल्ह्यात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी अनेक रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी परवड झाली होती. तिसऱ्या लाटेत ऑक्सिजनची कमतरता होऊ नये म्हणून सोलापूर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागातील रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभे केले आहे. ग्रामीण भागात ऑक्सिजनचा मोठा साठा तयार केला जात असल्याने ग्रामीण भागातील रुग्णांचा लोंढा सोलापूर शहरात येणार नाही, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. करमाळा, पंढरपूर, अकलूज, माळशिरस, अक्कलकोट, बार्शी, सांगोला, मंगळवेढा, मंद्रुप येथील सरकारी रुग्णालयात नवे ऑक्सिजन प्लांट उभे करण्यात आले आहेत.
- सोलापुरातील काँग्रेस भवन समोर शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन : काँग्रेसचे माजी आमदार व माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा अक्कलकोट येथे मातोश्री शुगर या नावाने साखर कारखाना आहे. या कारखान्यात तुळजापूर आणि उस्मानाबाद येथील शेतकऱ्यांनी ऊस दिले होते. एक वर्ष होऊन देखील एफआरपीची रक्कम न मिळाल्याने उस्मानाबाद आणि तुळजापूर येथील शेतकऱ्यांनी काँग्रेस भवन समोर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. जोपर्यंत उसाची सर्व रक्कम एक हाती मिळत नाही, तोपर्यंत ठिय्या आणि धरणे आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली होती. सोलापूर शहरातील काँग्रेस भवन समोर तब्बल एक महिना आंदोलन सुरू होते. भाजप नेते चंद्रकांत पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला होता.
- मार्कंडेय रुग्णालयातील बंद गॅस ऑक्सिजन टाकीचा स्फोट; दोन रुग्णांचा मृत्यू : एकीकडे कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावाला तोंड देत असताना सोलापुरातील मोठे सहकारी रुग्णालय मार्कंडेय हॉस्पिटलमध्ये बंद गॅस टाकीचा मोठा स्फोट झाला होता. ही दुर्घटना 24 मार्च 2021 रोजी रात्री दहाच्या सुमारास घडली होती. या दुर्घटनेमुळे दोन रुग्णांचा गुदमरून मृत्यू झाला होता. या घटनेने सोलापूर शहर आणि जिल्हा प्रशासन हादरले होते. याची चौकशी अद्यापही सुरू आहे. आणि मृतांस नुकसानभरपाई देखील मिळाली नाही.
- मराठा आरक्षणासाठी सोलापुरात आक्रोश मोर्चा : मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने 4 जुलैला आक्रोश मोर्चाचे अयोजन करण्यात आले होते. कोरोना महामारी रोखण्यासाठी पोलिसांकडून आक्रोश मोर्चास परवानगी नाकारण्यात आली होती. पोलीस परवानगी नसताना देखील मोर्चा काढण्यात आला. संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात झाली होती. लाखोंच्या संख्येने या मोर्चाला मराठा बांधव दाखल झाले होते. कोरोना विषाणूचा उद्रेक होईल या भीतीपोटी सोलापूर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पोलीस परवानगी नाकारली होती. पोलिसांच्या आदेशाला झुगारून मराठा समाजाने आक्रोश मोर्चा काढला होता. संभाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर पायी मोर्चा काढून सोलापूर शहर बंद झाले होते.
- 55 वर्ष आमदार म्हणून निवडून आलेले गणपतराव देशमुख यांचे निधन : शेकापचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे 30 जुलै रोजी निधन झाले. 30 जुलैला सायंकाळी त्यांची प्रकृती अचानक ढासळली आणि रात्री ९ च्या सुमारास त्यांनी सोलापुरातील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गणपतराव देशमुख हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून तब्बल ११ वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. सर्वाधिक वेळा विधानसभेत निवडून जाणारे आमदार म्हणून देशमुख यांची ओळख होती. २००९ च्या निवडणुकीत विजय मिळवून करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे देशमुख हे देशातले दुसरे आमदार ठरले होते. एक पक्ष, एक मतदारसंघ आणि एकच नेता असा विश्वविक्रमी सांगोल्याचा वारसा हरपला आहे.
- राज्य शासनात विलिनीकरणासाठी एसटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन सुरू : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारल्याने लालपरीची चाके थांबली आहे. राज्यासह सोलापूर जिल्ह्यातील एसटी सेवा बंद झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहे. वडापवाले आणि खासगी ट्रॅव्हल्सवाले प्रवाशांची लुटालूट करत आहेत. राज्य शासनात विलिनीकरण करा, या प्रमुख मागणीसह एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. सोलापूर आगारातील कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची तीव्रता वाढवली असून 8 नोव्हेंबरपासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व आगार बंद करण्यात आले आहे. एसटी सेवा पूर्णपणे ठप्प झाल्याने प्रवाशांना याची झळ बसत आहे. खासगी वडापवाले अव्वाच्यासव्वा दरात भाडे आकारून बेकायदेशीर प्रवाशी वाहतूक करत आहेत. सोलापुरात अद्यापही एसटी आंदोलन सुरू आहे.
- 2021 या वर्षात सर्वाधिक लाच घेण्यात पोलीस खाते अव्वल : अँटी करप्शन सोलापूर युनिटकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, सोलापूर शहर आणि जिल्ह्यात 2021 मध्ये एकूण 22 ठिकाणी अँटी करप्शनच्या कारवाया झाल्या. त्यामध्ये शहर आणि ग्रामीण पोलीस दलात 7 ठिकाणी कारवाई झाली असून 11 संशयित पोलिसांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. राज्य कर विभाग कारवाई 1 व आरोपी 1, ग्रामपंचायत कारवाई 3 आणि आरोपी 5, जिल्हा परिषद कारवाई 2 आरोपी 2, शिक्षण संस्था कारवाई 1 आरोपी 2, शासकीय तंत्रनिकेतन कारवाई 1 आरोपी 1, नगरपंचायत कारवाई 2 आरोपी 2, सोलापूर महानगरपालिका कारवाई 1 व 2 संशयित कर्मचारी अटक, आरोग्य विभाग कारवाई 1 व लाच घेताना अटक आरोपी 1, महसूल खात्यात कारवाई 1 व अटक आरोपी एक, असे विविध ठिकाणी अँटी करप्शन विभागाच्या अधिकारी - कर्मचारी यांनी नजर ठेवून प्राप्त तक्रारीनुसार, 22 ठिकाणी कारवाया केल्या आणि 30 संशयित लोकसेवकांना लाच घेताना बेड्या ठोकल्या. 2021 साली सर्वाधिक कारवाया पोलीस खात्यात झाल्याने लाच घेण्यात पोलीस खाते अव्वल आले आहे.