सोलापूर - शहर व जिल्ह्यात पुकारलेल्या सकल मराठा समाजाच्या आंदोलनास हिंसक वळण लागले. काही ठिकाणी किरकोळ दगडफेक झाली आहे. तर काही ठिकाणी फेरीवाल्यांच्या फळांच्या गाड्या पलटी केल्या आहेत.
सकल मराठा समाजाकडून 21 सप्टेंबर 2020 ला शहर व जिल्हा बंदची हाक दिली होती. त्यानिमित्ताने सोलापूर शहरातील विविध चौकात कडकडीत बंद पाळण्यात आला होता. आमदार व खासदारांच्या घरासमोर आसूड ओढो आंदोलनास सुरुवात झाली.
समाजकंटकांनी या आंदोलनास गालबोट लावले आहे. लष्कर येथील ममता रेडिमेड दुकानाला आज बंद आहे, दुकाने बंद ठेवा, दुकाने बंद करा अशा चिथावणी खोर आवाहने देत काहीजण फिरत होते. दुचाकीवर आलेल्या टवाळखोरांनी काही मिनिट दगडफेक करून दुकानाचे काच फोडून निघून गेले.
पार्क चौक येथील एका खासगी कोऑपरेटिव्ह बँकेचे एटीएम फोडले. काचेच्या दरवाजांना या समाजकंटकांनी दगडफेक करून फोडले आहे.
सात रस्ता येथे दुपारी 12.30 च्या सुमारास अनेक फळ विक्रेते हात गाड्यावर फळ विकत होते. त्याचवेळी प्रणिती शिंदे यांच्या निवासस्थाना समोर व शासकीय विश्रामगृह येथे आसूड ओढो आंदोलन सुरू होते. त्यावेळी अज्ञात समाजकंटक त्या ठिकाणी आले व फळ विक्रेत्याना बंद करा असे आवाहन देऊन फळांच्या हात गाड्या पलटी केल्या. यामध्ये फळांचे मोठे नुकसान झाले असून सदर बझार पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.