सोलापूर - मी अजून म्हातारा झालो नाही. येत्या काळात अनेकांना घरी बसवायचे आहे. त्यासाठी मी बाहेर पडलो, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. सोलापुरातील जनता ही गरीब असली तरी लाचार नाही, असे म्हणत सत्तेसाठी लाचार झालेल्यांना ही तरुणाई घरचा रस्ता दाखवेल, असा टोला पवारांनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना लगावला. पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा हुतात्मा स्मृती मंदिरात पार पडला. यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा - कितीही झाले तरी तुरुंगात गेलो नाही, शरद पवारांचा अमित शाहांना टोला
सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र, मागील काही दिवसात राष्ट्रवादीचे अनेक बडे नेते राष्ट्रवादी सोडून दुसऱ्या पक्षात गेले तर काहीजण पक्षांतर करण्याच्या वाटेवर आहेत. त्यामुळे पवारांनी आजच्या मेळाव्यात पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर टीका केली. मी आता जो घराबाहेर पडलो आहे, तो अनेकांना घरी बसवण्यासाठी. त्यामुळे जे गेले त्यांची चर्चा करू नका, सत्ताधारी लोकांच्या दारात जाऊन लाचार झालेल्या लोकांचा विचार करू नये, असेही पवार यावेळी म्हणाले.
हेही वाचा - ‘स्वाभिमान’ हा शब्द सध्या कोणत्याही राजकारण्याने वापरू नये
राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेकजण अनुपस्थित-
पवारांच्या सभेसाठी सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अनुपस्थित होते. यामध्ये नुकतेच जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेले माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, माढा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे तसेच माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढलेले संजय शिंदे हे देखील अनुपस्थित होते. त्यामुळे येत्या काही दिवसातच सोलापूर जिल्ह्यातील ही दिग्गज मंडळी राष्ट्रवादी सोडून सेना किंवा भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पवारांच्या आजच्या सभेमध्ये मोहोळचे माजी आमदार राजन पाटील आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम काका साठे हे दोन नेते वगळले तर सर्व उपस्थित हे कार्यकर्ते होते.