सोलापूर - सोलापूर रेल्वे स्थानकातून ठरलेल्या वेळेत निघालेल्या एक्स्प्रेस गाडीत चढताना प्रवाशाचा हात सुटला. संबंधित प्रवाशी रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये जाता जाता वाचला. सोलापूर विभागातील रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) च्या जवानांनी सतर्कतेने त्या प्रवाशाचा जीव वाचविला. ही घटना आहे सोलापूर रेल्वे स्थानकावर घडली. याबाबत माहिती देताना आरपीएफचे निरीक्षक सतीश विधाते यांनी सांगितले की, मोठ्या सतर्कतेने पोलीस जवान अंकुश ओमणे यांनी अज्ञात व्यक्तीचे प्राण वाचविले ही कौतुकास्पद बाब आहे. यापूर्वीही अनेक अपघातांमध्ये रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी अनेक प्रवाशांचा जीव वाचविला आहे.
मुंबई हैद्राबाद एक्सप्रेस मधून हात निसटला - मुंबई- हैदराबाद एक्स्प्रेस सोलापूरहून हैदराबादच्या दिशेने निघाली. याचवेळी सोलापूर रेल्वे स्थानकावर बंदोबस्तासाठी असलेले अंकुश ओमणे यांना चालत्या गाडीत पळत पळत जात रेल्वे पकडण्याच्या प्रयत्नात असलेला प्रवासी दिसला. ट्रेनच्या एस -6 या डब्यात चढताना दरवाजाच्या हॅण्डलपासून त्या प्रवाशाचा हात सुटला.संबंधित प्रवासी रेल्वेतून पडत होता.रेल्वेच्या सुरक्षा बलाच्या जवानांनी त्याला पकडून सुखरूप प्लॅटफॉर्मवर बाजूला केले.आणि प्रवाशाचा जीव वाचविण्यात यश मिळविले. यावेळी रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी झाली होती.
आरपीएफ कर्मचारी अंकुश ओमणेंवर कौतुकाचा वर्षाव- रेल्वे सुरक्षा बलाचे जवान अंकुश ओमणे यांनी कर्तव्यदक्षतेने ऑपरेशन 'जीवन रक्षा' अंतर्गत एका अज्ञात प्रवाशाचे प्राण वाचवण्याचे कौतुकास्पद कार्य केले. त्याबद्दल सुरक्षा आयुक्त श्रेयांश चिंचवाडे, पोलीस निरीक्षक सतीश विधाते यांच्यासह अन्य वरिष्ठ आरपीएफ पोलिसांनी संबंधित जवानाचे कौतुक केले.