Hair care Tips: सुंदर, मजबूत आणि काळेभोर केस सर्वांना हवे असतात. परंतु प्रदूषण, अयोग्य खाणपाण आणि हार्मोनल बदल, जीवनसत्त्वे, ओमेगा 3 फॅटी अॅसिड तसंच शरीरातील प्रथिनांच्या अभावामुळे अनेकांना केसांच्या समस्यांचा सामना करावा लागतो. केस पातळ आणि केसगळतीची समस्या अगदी सामान्य झाली आहे. केस मजबूत आणि सुंदर दिसावेत याकरिता अनेक उपाय देखील केली जातात. महागडे ऑईल तसंच शॅम्पू आणि कंडिशनर वापरून सुद्धा काही उपयोग होत नाही. केसांचे आरोग्य चांगलं ठेवणे आव्हानात्मक काम आहे. परंतु, तुम्हाला माहिती आहे काय? केस निरोगी ठेवण्यासाठी योग्य पोषणाची काळजी घेणे आवश्यक आहे. पोषक घटकांच्या अभावामुळे देखील या समस्या उद्भवू शकतात. काही सुपरफूड्समध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात. जे केसांचे अकाली पांढरे होणे, केस गळणे आणि कोरडेपणापासून बचाव करु शकतात. चला तर जाणून घेऊया निरोगी आणि काळेभोर केसांसाठी काय आहे चांगलं.

आवळा: आवळा हे केसांसाठी सर्वात फायदेशीर सुपरफूडपैकी एक आहे. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स केस पांढरे होण्यापासून त्यांचा बचाव करतात आणि मजबूत करतात. आवळा नियमित खाल्ल्याने केस जाड आणि चमकदार होतात असे तज्ञांचे म्हणणे आहे. आवळा पाणी केसांना लावल्यास केस लवकर काळे होवू शकतात. तसंच आवळ्यामधील बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे पदार्थ तसंच अँटिफंगल गुणधर्म स्कॅल्फ इन्फेक्शन त्याचबरोबर कोंड्याची समस्या दूर करण्यास उपयुक्त आहे. अधिक परिणामांकरिता तुम्ही आवळामध्ये कोरफड घालून केसांना लावू शकता. केसांना मॉइश्चरायझ करण्यासाठी कोरफड फायदेशीर आहे. कोरफडीमुळे केस लांब आणि दाट देखील होतात.

अक्रोड: अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड, बायोटिन आणि व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात आढळतात. हे केसांच्या मुळांना पोषण देतात. यामुळे केसगळती थांबते तसंच केसांची चमक टिकवून ठेवण्यास मदत होते. अक्रोडमधील पोषक घटक केसांच्या आरोग्यासाठी चांगले आहेत. यामुळे केस मजबूत आणि निरोगी राहतात. ज्यांच्या केसांची वाढ खुंटली असेल त्यांनी अक्रोडच्या तेलानं केसांची मसाज करा तसंच आहारात अक्रोडच्या तेलाचा समावेश करा.

पालक: पालक केसांसाठी वरदानापेक्षा कमी नाही. कारण पालकामध्ये भरपूर लोह, फोलेट आणि व्हिटॅमिन ए, आयर्न असते. जे टाळूमध्ये रक्त परिसंचरण वाढवते आणि केस गळती रोखते. तसंच हे केसांना निरोगी आणि मजबूत ठेवण्यास मदत करते. पालकामधील आयर्न केसांची आरोग्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. आयर्नमुळे केसांच्या मुळापर्यंत ऑक्सिजन पोहचण्यास मदत होते. परिणामी केस हेल्थी आणि मजबूत राहतात. पालकामधील अंटीइन्फेमेटरी तसंच अँटीऑक्सिडंट्स घटकांमुळे डॅंड्रफ होत नाही.

जवस: जवस महिलांसाठी वरदानापेक्षा कमी नाही. जवसामध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे केस गळण्यास प्रतिबंध करते आणि केसांची जलद वाढ करते. तुम्ही केसांसाठी जवसाचं तेल वापरू शकता. जवसाचं तेल असंच लावण्यापेक्षा त्याला गरम करून केसांना लावावे. त्यानंतर एक टॉवेल गरम पाण्यात बुडवून केसांना गुडाळावे. अर्धा तासानंतर केस धुवतल्यास केस चमकदार आणि मऊ होतात. तसंच केसांची गळतीही थांबते.

अंडी: अंड्यांमध्ये प्रथिने आणि बायोटिन भरपूर प्रमाणात असते. केसांच्या वाढीसाठी हे आवश्यक आहे. अंड्यामधील प्रोटीन्स केस हेल्थी आणि मजबूत ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. तुम्ही अंड्यामध्ये इतर घटक देखील टाकून लावू शकता. अंडी, कोरफड आणि बदामाचं तेल एकत्र मिक्स करा. तयार झालेलं मिश्रण केसांना लावा. काही मिनिटांनी केस सौम्य शाम्पूनं धुवा. यामुळे नवीन केस येण्यास मदत होते तसंच केस लांब होतात.
- गाजर: गाजरमध्ये व्हिटॅमिन ए आणि बीटा-कॅरोटीन भरपूर प्रमाणात असते, जे टाळूला पोषण देते आणि केसांना निरोगी ठेवते. हे केसांची मुळं मजबूत करते.
- भोपळ्याच्या बिया: भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात, लोह आणि प्रथिने असतात. हे केसांचे अकाली पांढरे होणे थांबवते आणि केस गळणे कमी करण्यास मदत करते.
- दही: दह्यामध्ये प्रथिने आणि व्हिटॅमिन बी५ असते, जे केसांना पोषण देते आणि ते जाड आणि चमकदार ठेवते. हे केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करते.
- तुमच्या केसांना आतून पोषण देण्यासाठी वरील पदार्थ तुमच्या आहारात समाविष्ट करा. ते केस मजबूत, काळे आणि जाड ठेवण्यास मदत करतात.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)
संदर्भ
https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/37487962/
https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/36237143/