पुणे- पुणे तिथं काय उणे ही म्हण सातत्याने बोलली जाते आणि याची प्रचिती ही वेळोवेळी आपल्याला पाहायलादेखील मिळते. पुण्यातील हडपसर येथे असाच काहीसा प्रकार घडलाय. पुण्यातील हडपसर भागात असणाऱ्या मार्व्हल बाउंटी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका महिलेने तब्बल एक दोन नव्हे तर 300 हून अधिक मांजरी 3BHK फ्लॅटमध्ये पाळल्यात. त्यामुळे पुण्यात याची जोरदार चर्चा आहे. परंतु महिलेने पाळलेल्या या मांजरींचा सोसायटीतील लोकांना त्रास होत असून, याबाबतची तक्रार महापालिकेकडेदेखील केलीय.
फ्लॅटमध्ये जवळपास 350 हून अधिक मांजरी : सोसायटीचे रहिवासी म्हणाले की, आमच्या सोसायटीमध्ये चौथ्या मजल्यावर मांजर आहे, असं कळलं. हे प्रकरण गेल्या 5 वर्षांपासून सुरू असून, सुरुवातीला त्यांच्याकडे कमी प्रमाणात मांजरी होत्या. याबाबत सोसायटीने पोलीस अन् महापालिकेकडे याबाबत तक्रारदेखील दिलीय. आता तर या फ्लॅटमध्ये जवळपास 350 हून अधिक मांजरी आहे, अशी आम्हाला माहिती मिळालेली आहे. या मांजरीमुळे सोसायटी आणि आजूबाजूस उग्रवास येत असून, सोसायटीमधील लोकांना प्रचंड त्रास होतोय आणि रहिवाशांना याचा प्रचंड मनस्ताप होतोय. भीतीचं वातावरण निर्माण झालंय. तसेच सकाळी दुपारी आणि संध्याकाळी या मांजराचा खूप जोरात रडण्याचा आवाज येत असतो आणि यामुळे आम्हालादेखील खूप त्रास होतो, असंही यावेळी नागरिकांनी सांगितलंय.
...अन् आरोग्य अधिकाऱ्याला चक्कर आली : या संदर्भात या महिलेच्या घरी काल आरोग्य अधिकारी यांनी येऊन पाहणी करून गेले, त्यावेळेस आरोग्य अधिकाऱ्याला चक्कर आली. त्यांनी या महिलेला नोटीस दिली असून, 48 तासांत त्यांनी या मांजरींना बाहेर काढले नाही तर प्रशासनाकडून कारवाई करून या मांजरी बाहेर काढल्या जाणार आहेत.
लवकरात लवकर या मांजरी बाहेर काढल्या जाणार : आज सकाळी पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे यांनीदेखील इथं येऊन पाहणी केली आहे. या महिलेने मांजरी पाळल्या असल्याची माहिती समोर आलीय, तिला आम्ही नोटीस दिलेली आहे आणि त्या संदर्भात महापालिकेशी आम्ही पत्रव्यवहार करणार आहोत, लवकरात लवकर या मांजरी बाहेर काढल्या जाणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलंय.
हेही वाचाः
सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न होणार पूर्ण; 'प्रधानमंत्री आवास योजने'त 20 लाख नवीन घरं मंजूर