पुणे : राज्यात लवकरच 'लव्ह जिहाद विरोधी कायदा' केला जाणार असून त्यासाठी उच्चस्तरीय समितीची नेमणूक देखील केलीय. मात्र, आता यावर राजकारण सुरू झालय. 'लव्ह जिहाद विरोधी' कायद्याला विरोध होत आहे. धर्मांतर विरोधी कायदे असतानाही नवा कायदा अस्तित्वात आणण्याचा हेतू हा संविधान विरोधी असल्यानं, त्यास मुस्लिम सत्यशोधक मंडळाचा विरोध असल्याचं यावेळी मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमशुद्दीन तांबोळी यांनी सांगितलं.
वेगळा धर्मांतर विरोधी कायदा कशासाठी? : याबाबत मुस्लिम सत्यशोधक मंडळानं पत्रक काढत लव्ह जिहाद कायद्याला विरोध केलाय. यावेळी मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमशुद्दीन तांबोळी म्हणाले," धर्मांतर विरोधी कायदा हा केवळ शत्रुभाव वाढवण्यासाठी आणि राजकीय हेतू साध्य करण्यासाठी तयार केला जात आहे. जबरदस्तीनं प्रलोभने दाखवून, धमकावून अथवा फसवून करण्यात येणारे धर्मांतर हे अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार बेकायदेशीर आणि गुन्हेगारी वर्तन आहे. मग वेगळा धर्मांतर विरोधी कायदा कशासाठी? एका बाजूला घरवापसीस समर्थन आणि प्रोत्साहन देताना तथाकथित लव्ह जिहादच्या नावाने अपप्रचार करून मुस्लिम समाजाविरुद्ध वातावरण तापवण्याचा, शत्रुभाव निर्माण करणारा, या समाजाला धमकावण्याचा आणि समाजाला असुरक्षित वाटेल असं वातावरण निर्माण करण्याचा हा एक भाग आहे. देशात किंवा महाराष्ट्रात अशा लव्ह जिहादच्या किती घटनांची नोंद आहे? एखाद्या व्यक्तीनं खरोखरच असं दुष्कृत्य केल्यास अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार शिक्षा झालीच पाहिजे. परंतु, "एका व्यक्तीचं दुष्कृत्य हे संपूर्ण समाजाचं दुष्कृत्य" अशी प्रतिमा केल्यानं धार्मिक सौहार्द, सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेलाच नख लागणार आहे".
मुस्लीम सत्यशोधक मंडळाचा विरोध : "धर्मनिरपेक्ष एकात्म भारतीय समाज निर्माण करण्यासाठी सर्वांना १९५४ चा विशेष विवाह कायदा अनिवार्य असावा किंवा भारतीय संविधानास अपेक्षित असलेला समान नागरी कायद्यासाठी मुस्लिम सत्यशोधक मंडळ गेल्या साठ वर्षांपासून आग्रही असून असा कायदा अस्तित्वात आल्यास मंडळ त्याचं स्वागत करील. मात्र, धर्मांतर विरोधी कायदे असतानाही नवा कायदा अस्तित्वात आणण्याचा हेतू संविधान विरोधी असल्यानं त्यास मुस्लिम सत्यशोधक मंडळाचा विरोध असेल", असं डॉ. शमशुद्दीन तांबोळी म्हणाले.
हेही वाचा -
- महाराष्ट्रात 'लव्ह जिहाद' विरोधी कायदा अस्तित्वात येणार? संजय शिरसाट म्हणाले, "येणाऱ्या अधिवेशनात..."
- 'मुलं जन्माला घालून तरुणीला सोडण्याची प्रवृत्ती': लव्ह जिहादवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
- महाराष्ट्रात लव्ह जिहाद अन् सक्तीचे धर्मांतर थांबवण्याची तयारी, राज्य सरकारने उच्चस्तरीय समितीची केली स्थापना