सोलापूर - शहरातील हांडे फ्लॅट येथील अमोल जगताप यांनी पत्नी (वय 36 वर्ष,) मयुरी अमोल जगताप (वय 27 वर्ष),हिचा दोरीने गळा आवळून खून केला होता तर दोन मुलं आदित्य अमोल जगताप (वय 5 वर्ष), आयुष अमोल जगताप (वय 3 वर्ष) यांना गळफास देत खून करून स्वतः देखील गळफास घेत आत्महत्या केलीे होती. खाजगी सावकारांच्या जाचास कंटाळून ही आत्महत्या करत कुटुंबाला संपविले होते. या प्रकरणात व्यंकटेश पंपया डंबलदिनी (वय 42 रा हैद्राबाद रोड, मार्केट यार्ड समोर)या खासगी सावकारला फौजदार चावडी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे.
या प्रकरणाची माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साळुंखे म्हणाले, अमोल जगताप यांनी व्यंकटेश याकडून 60 ते 70 लाख रुपये व्याजाने घेतले होते. याबदल्यात सावकाराने हॉटेल गॅलेक्सी ऑर्केस्ट्रा बार स्वतःच्या नावावर लिहून घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याला आज शनिवारी कोर्टात हजर करण्यात येणार असून खोलवर तपास सुरू असल्याची माहिती दिली.
अमोल जगताप यांचा कोंडी तालुका उत्तर सोलापूर येथे गॅलेक्सी नावाचे हॉटेल व ऑर्केस्ट्रा बार आहे. भाऊ राहुल जगताप व अमोल जगताप हे दोघे मिळून हॉटेलचा व्यवसाय करत होते. सोमवारी(13 जुलै) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास अमोल यांनी भाऊ राहुल यास फोन करून सांगितले की, मी मुलांना व पत्नीस संपविले आहे आणि मी देखील आत्महत्या करत आहे.
राहुल जगताप यांनी ताबडतोब पोलिसांशी संपर्क करून अमोल यांचे घर गाठले. घराचा दरवाजा बंद असल्याने एकमेकांच्या मदतीने दरवाजा तोडण्यात आला. आतमध्ये प्रवेश केले असता, दोन मुले फासावर लटकावले असल्याचे दिसले व दुसऱ्या बेडरूम मध्ये पत्नी मयुरी जगताप या बेडवर पडलेल्या होत्या. त्यांचा दोरीने गळा आवळून खून केला होता, तर अमोल जगताप हे देखील गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकावलेल्या अवस्थेत आढळून आले होते.
जगताप यांनी खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून हे कृत्य करत असल्याचे एका चिठ्ठीत नमूद केले होते. त्यामुळे या प्रकरणामध्ये आणखीन काही खासगी सावकारांची नावे आहेत, पोलीस निरिक्षक संजय साळुंखे यांनी सांगितले आहेत व काही राजकीय लोक देखील यामध्ये समाविष्ट असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपीचे हैद्राबाद रोडवरील मार्केट यार्ड समोर मोठी ऑइल मिल देखील आहे. आणखीन आरोपींचा शोध घेतला जात असून नवीन नावे निष्पन्न होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.