सोलापूर- सोलापूर महानगरपालिका प्रशासनानेदेखील चिमणी पडण्यासंदर्भात टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे. यावर खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी आज सायंकाळी प्रतिक्रिया दिली आहे. यापूर्वी साखर कारखान्याचे चेअरमन धर्मराज कडादी यांनी सोलापूरच्या विकासासाठी गरज पडल्यास सिद्धेश्वर सहकारी कारखान्याची चिमणी स्थलांतरित करू, असे आश्वासन दिल्याची खासदारांनी आठवण करून दिली.
शहरात दररोज विमानसेवा सुरू व्हावी यासाठी वेगवेगळे पाठपुरावे होत आहेत. परंतु एअरपोर्ट आथोरिटी ऑफ इंडियाने दिलेल्या अहवालानुसार सोलापुरला सुरू होणाऱ्या विमान सेवेला सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी अडथळा होत असल्याचा अहवाल दिला होता. परंतु 2017 पासून विमानतळ शेजारी असणाऱ्या साखर कारखान्याने हटवाद अवलंबला आहे. त्यांनी चिमणी पाडण्यास विरोध दर्शवला आहे. त्याबाबत बोलताना खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी म्हणाले की, साखर कारखान्याचे चेअरमन धर्मराज कडादी हे सुज्ञ आहेत. ते प्रशासनास सहकार्य करतील, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.
हेही वाचा-साखर कारखान्याच्या चिमणीचा वाद विकोपाला; धर्मराज काडादींवर थोबडेंचा शाब्दिक हल्लाबोल
विमानसेवेचा विषय सोलापुरसाठी ज्वलंत-
सोलापूर शहरातील विमान सेवेचा विषय अतिशय ज्वलंत होत चालला आहे. यामध्ये सोलापूर विकास मंचने पुढाकार घेऊन अडथळा असणाऱ्या चिमणीचा विषय लावून धरला आहे. चिमणीच्या मुद्द्यावरून वाद विवाद होत आहेत. विमान सेवा सुरू झाल्यास सोलापूरचे विकास होण्यास मदत होईल, अशी शहरातील उद्योजकांची अपेक्षा आहे.
हेही वाचा-साखर कारखान्याच्या चिमणीचा बाऊ केला: धर्मराज काडादि
2014 मध्ये 90 मिटरची चिमणी उभारण्यात आली-
सोलापूर सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची स्थापना 1971 साली झाली. त्याच मार्गावर 1986 साली होटगी रोड येथे विमानतळ उभारण्यात आले. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याने देखील सोलापुरच्या विकासात मोठा वाटा उचलला आहे. तर सद्यस्थितीत विमानसेवादेखील सोलापूरच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. 2014 ला साखर कारखान्याने 90 मीटर उंचीची चिमणी उभारली आहे. या चिमणीची उंची अधिक असल्याने विमान उडताना ( टेक ऑफ) चिमणीचा अडथळा होत आहे. त्यामुळे विमान सेवा रखडली आहे.
साखर कारखान्यामुळे अनेकांना रोजगार मिळाले आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विकासात या साखर कारखान्याने हातभार लावला आहे. तर सोलापूरच्या विकासात अडथळा कसा होतो, असा सवालदेखील साखर कारखानदारांच्या प्रशासनाच्यावतीने यापूर्वी उपस्थित करण्यात आला होता.