सोलापूर - वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. यामुळे सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व व्यपार ठप्प झाले आहेत. दोन महिने झाले तरी प्रशासनाने अत्यावश्यक व जीवनावश्यक व्यवहार वगळता सर्व व्यापार बंदच करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शहरातील लाट ओसरू लागली आहे. पण, राज्य शासनाने शिथिलता करण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनावर सोपवली आहे. सोलापूर शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी मंगळवारी (दि. 1 जून) सकाळी महानगरपालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन बाजार पेठ सुरू करुन व्यापार सुरू करण्याची परवानगी द्या, अशी मागणी केली आहे.
व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने घेतली आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांची भेट
आज नवी पेठ, मंगळवार पेठ आदी ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी नगरसेवक आनंद चंदनशिवे, माजी आमदार दिलीप माने यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर व जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सर्व प्रकारचे व्यापार आणि व्यवहार सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनद्वारे केली.
सकाळपासून फलटण गल्ली, चाटी गल्लीतील व्यापारी वर्गात असंतोषाचे वातावरण
मंगळवारी सकाळपासून फलटण गल्ली, चाटी गल्ली येथे तणावपूर्ण वातावरण होते. फलटण गल्ली आणि चाटी गल्ली येथे मोठ्या प्रमाणात कापड व्यापाऱ्यांची दुकाने आहेत. 1 जूनला सर्व व्यवहार सुरळीत होतील या अपेक्षेने सर्व व्यापारी वर्गाने एकत्र जमून दुकाने उघडण्याचा प्रयत्न केला होता. पण, व्यापारी वर्गातील एका नेत्याने मध्यस्ती करून प्रशासनाने अजूनही परवानगी दिली नाही. कायदा हातात घेऊ नका, प्रशासनास सहकार्य करा, असे आवाहन केले. फलटण गल्ली, चाटी गल्ली, नवी पेठ आदी बाजार पेठेत पोलिसांचे पथकही दाखल झाले होते.
शहर व जिल्ह्यातील परिस्थिती जैसे थे
1 जूननंतर सर्व व्यवहार सुरळीत होईल, अशी अपेक्षा अनेक व्यापाऱ्यांना होती. पण, 31 मेच्या रात्री उशिरापर्यंत जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्ताची संयुक्त बैठक झाली. रात्री 1 वाजण्याचा सुमारास महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांचे स्वतंत्र आदेश निघाले आणि शहर आणि जिल्ह्यातील परिस्थिती जैसे थे, असा निर्णय घेण्यात आला. सकाळी 7 ते 11 दरम्यान फक्त अत्यावश्यक वस्तूंच्या व्यवहारासाठी परवानगी देण्यात आली.
हेही वाचा - ऊसतोड कामगाराच्या डॉक्टर मुलाचा कोरोनाने मृत्यू; राहुलचे डॉक्टर होण्याचे स्वप्न अपूर्ण