सोलापूर - लॉकडाऊनमध्ये नोकरी जाऊन बेरोजगार झालेल्या महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सोलापुरातील महालक्ष्मी गृहउद्योग समोर आला आहे. महिलांना पापड बनवण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार देण्याची हमी तरुण उद्योजक राजू डोंगरे यांनी दिली आहे. सोलापूर शहरातील कितीही महिलांना रोजगार देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे राजू डोंगरे यांनी 'ई टीव्ही भारत'शी बोलतांना सांगितले आहे.
लॉकडाऊनच्या काळात अनेक महिलांच्या हातचे काम गेले आहे. घरकाम करणाऱ्या अनेक महिला या बेरोजगार झाल्या आहेत . कोरोना महामारीच्या संकटकाळात बेरोजगार झालेल्या महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा संकल्प सोलापूर शहरातील राजू डोंगरे यांनी केला. शहरातील कितीही महिला रोजगार मागायला आल्या तर त्यांना रोजगार उपलब्ध करून त्यांच्या कष्टाला योग्य तो आर्थिक मोबदला दिला जाईल, असे आश्वासन राजू डोंगरे यांनी दिली आहे.
राजू डोंगरे हा सोलापुरातील एका गिरणी कामगाराचा मुलगा आहे. सोलापुरातील गिरण्या बंद पडल्यामुळे देशोधडीला लागलेल्या गिरणी कामगार कुटुंबातील राजू डोंगरे हे लहान वयातच कुटुंबाची हलाखीची परिस्थिती असल्यामुळे शिक्षण घेऊ शकले नाही. लहान वयापासूनच त्यांनी अंगमेहनत करून घराच्या उत्पन्नासाठी हातभार लावला आहे. कमी शिकलेल्या या तरुणानं 2013 साली सोलापुरात महालक्ष्मी पापड उद्योग या नावाने उद्योग सुरू केला. अवघ्या 15 महिलांना घेऊन सुरू केलेला हा उद्योग आता जवळपास पाच हजार महिलांना रोजगार देत आहे सोलापूर शहरातील पाच हजार महिला पापड बनवून राजू डोंगरे यांना देतात. राजू डोंगरे यांनी अशिक्षित असतानादेखील स्वतःच्या कष्टाच्या जोरावर महालक्ष्मी पापड उद्योग हा भरभराटीस आणला आहे. सोलापूर शहरातील अकरा सेंटरवर महिलांना पापड बनवण्याचे प्रशिक्षण दिले जाते.
दरम्यान, शहरातील पाच हजार पेक्षा जास्त महिला या उद्योगांमध्ये काम करतात. लॉकडाऊनच्या काळात हा पापड उद्योग देखील बंद होता. मात्र, मागील पंधरा दिवसांपासून पापड बनवण्याचे काम सुरू झाले आहे. लोकडाऊनच्या काळात अनेक महिला बेरोजगार झाल्या असल्यामुळे बेरोजगार झालेल्या महिला राजू भोसले यांच्याकडे येऊन कामासाठी विचारणा करू लागल्या आहेत. अशावेळी राजू डोंगरे यांच्या लक्षात आले की, अनेक महिलांच्या हातचे काम गेले आहे आणि अशा बेरोजगार झालेल्या महिलांना रोजगार उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. त्यामुळेच राजू डोंगरे यांनी ज्या महिला बेरोजगार झाल्या आहेत अशा महिलांना तंत्रशुद्ध पापड बनवण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार देण्याची हमी घेतलेली आहे. शहरातील कितीही महिला पापड बनवण्यासाठी इच्छुक असतील त्या सर्वांना रोजगार देऊ, असे राजू डोंगरे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.