सोलापूर - हॉटेल खान चाचा येथील मालक, कर्मचारी व पोलीस कर्मचाऱ्यामध्ये हाणामारी झाली होती. या प्रकरणी सर्व संशयीत आरोपींचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.के. अनुभुले यांनी मंजूर केला आहे. परंतु या प्रकरणात मोदी पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक राचप्पा चानकोटी यांचे मात्र निलंबन झाले आहे. यामधील सलमान मोहम्मद शफी खान, अल्ताफ रफिक पठाण, रिहान शफी खान ,मोहम्मद अन्सारी, मुजाहिद हुसेन अन्सारी, अनवर उर्फ अन्नू जोडगे, सिदेश्वर हेगडे, सैफन मुलाणी, सादिक उर्फसिकंदर शेख, शहनावाज सय्यद या संशयीत आरोपींचा जामीन मंजूर झाला असल्याची माहिती अॅड रियाझ शेख यांनी दिली.
जेवणावरून झाली होती हाणामारी-
दिनांक 10 ऑक्टोबर 2020 रोजी मुख्यालय येथे नियुक्त असणारे पोलीस कर्मचारी अमोल सुरेश बेगमपुरे हे रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मोदी येथे असलेल्या हॉटेल खान चाचा येथे जेवण्यासाठी गेले होते. रात्री 10 नंतर जेवण नाही, असे सांगितले असता यावरून वाद झाला. हॉटेल कर्मचारी, मालक आणि पोलीस कर्मचारी अमोल बेगमपुरे यांच्यामध्ये काठ्याने हाणामारी झाली होती. या हाणामारीत पोलीस कर्मचारी अमोल बेगमपुरे गंभीर जखमी झाले होते.
गुन्हा दाखल फक्त हॉटेल चालकावर-
11 ऑक्टोबर 2020 रोजी याबाबत सदर बझार पोलीस ठाण्यात भांदवी कलम 307 नुसार गुन्हा दाखल झाला होता. या हाणामारीचे चित्रीकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. या व्हिडीओ चित्रीकरणामध्ये अमोल बेगमपुरे देखील मारामारी करत असतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सदर बझार पोलीस ठाण्यात फक्त अमोल बेगमपुरे यांची तक्रार घेण्यात आली. परंतु हॉटेल कर्मचाऱ्यांची किंवा हॉटेल मालकाची तक्रार घेण्यात आली नव्हती.
अॅड रियाझ शेख यांनी याबाबत कोर्टात मागणी केली आहे. लवकरच पोलीस कर्मचाऱ्याविरोधात देखील गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्राप्त करू असेही अॅड रियाझ शेख यांनी सांगितले.
सीसीटीव्हीचे चित्रीकरण व्हायरल केल्याप्रकरणी पीएसआयचे निलंबन-
यामध्ये तपास करत असतांना पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सीसीटीव्हीचे चित्रीकरण गुप्त ठेवण्यात आले नाही. हे चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल कसे झाले असा ठपका ठेवत, मोदी पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक राचप्पा चांनकोटी यांचे देखील निलंबन करण्यात आले आहे.
हेही वाचा- सरकारच्या प्रस्तावावर दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांची पुन्हा बैठक