सोलापूर - माढा लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या आणखी दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
करमाळा विधानसभा मतदारसंघातून २०१४ साली संजय शिंदे यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी देखील संजय शिंदे या नावाने ४ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. संजय शिंदे यांचा अवघ्या २ हजार मतांनी पराभव झाला होता. इतर ४ संजय शिंदे यांना ७ हजार मते मिळाली होती. त्यामुळे, या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा संजय शिंदे यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या इतर दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये एकूण ४२ उमेदवारांनी ५२ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी १३ जणांनी १५ अर्ज दाखल केले होते. माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि सुभाष देशमुख यांनी अर्ज दाखल केले आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय मामा शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. वंचित बहुजन आघाडीकडून विजयराव मोरे आणि इतर ४२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
माढा लोकसभेच्या उमेदवारी अर्जाची आज (शुक्रवारी) छाननी होणार असून ८ एप्रिलला दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ आहे. त्यानंतर उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येणार आहे.