सोलापूर- कोरोनाच्या संकटात सावकारी पाशाचा जिल्ह्यात आणखी एक बळी गेला आहे. शहरातील 40 वर्षीय हॉटेल चालकाने गळफास घेत जीवन यात्रा संपविली आहे.
शहरात मुख्य चौकात असलेल्या हॉटेल मालकाने शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास राहत्या घरी लोखंडी अँगलला साडीच्या साहाय्याने गळफास घेतला आहे. सावकारी जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यांच्या खिशामध्ये सावकारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची असल्याची चिठ्ठी सापडली आहे. यावरून तपास करून पोलीस गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया करत आहेत.
सकाळी घरातील इतर व्यक्तींना गळफास केतन यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह खाली उतरवून सिव्हील हॉस्पिटलमध्ये नेला. यावेळी डॉक्टरांनी हॉटेल चालकाला मृत घोषित केले. याबाबत सिव्हिल पोलीस चौकीच्या डायरीमध्ये नोंद झाली आहे. जेलरोड पोलीस ठाणे येथे अधिक चौकशी करून गुन्हा नोंद होण्याची प्रक्रिया सुरू आहे. हॉटेल मालकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला होता. मृताला कोरोना झाल्याची माहिती समोर आली आहे. मृताच्या पश्चात पत्नी, दोन मुले व आई-वडील असा परिवार आहे.
हे हॉटेल मालक गेल्या वीस वर्षांपासून हॉटेल चालवित होते. जुलै महिन्यात अमोल जगताप आत्महत्या प्रकरणानंतर अनेक सावकरी गुन्हे सोलापुरातील विविध पोलीस ठाण्यात नोंद झाले आहेत. काहीच दिवसांपूर्वी एका रिक्षाचालकाने सावकारी पाशातून गळफास घेतला होता. त्याची नोंद सलगरवस्ती पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. ही घटना ताजी असताना हॉटेल चालकाने सावकारी जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याने व्यावसायिकांमध्ये अस्वस्थता आहे.