सोलापूर - सोलापुरात 5 जानेवारी रोजी दुपारी एक दुर्दैवी व हृदयद्रावक घटना घडली आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी येथे शेततळ्यात बुडून तीन मुलींचा मृत्यू ( Three minor girls drowned solapur ) झाल्याची घटना घडली आहे. उत्तर सोलापूर येथील मार्डी या गावातील सदाशिव जगताप यांच्या शेतातील शेततळ्यात पाणी पिण्यास गेलेल्या तीन मुलींचा मृत्यू झाला आहे. तिन्ही मुलींचा मृतदेह सोलापुरातील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनसाठी आणण्यात आला आहे. या घटनेने सोलापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
तीन अल्पवयीन मुलींचा शेततळ्यात बुडून मृत्यू -
सानिका सोनार (वय 17 वर्ष, रा मार्डी, उत्तर सोलापूर), पुजा सोनार ( वय 13 वर्ष, रा,मार्डी, उत्तर सोलापूर), आकांक्षा युवराज वडजे ( वय 11 वर्ष, रा.मार्डी, उत्तर सोलापूर) या तिन्ही मुली अल्पवयीन होत्या. संपूर्ण मार्डी गावावर शोककळा पसरली आहे. घटनास्थळी मृतांचे नातेवाईक मोठ्या संख्येने जमा झाले होते. तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.
पाणी पिण्यासाठी गेलेल्या मुलीं परत आल्याचं नाही -
सानिका, पूजा आणि आकांक्षा या तिन्ही मुली पाणी पिण्यासाठी शेततळ्यात उतरल्या होत्या. शेततळ्याच्या आजूबाजूला प्लास्टिकचे आवरण असल्याने एकीचा पाय घसरला. एका मुलीचा पाय घसरून पडलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात दोन्ही मुलींनी आपले प्राण गमावले. पाण्यात बुडून एकाच वेळी तीन मुलींचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.