सोलापूर - साईबाबा चौक येथील गड्डम व भंडारी टॉवेल कारखान्याला आग लागून अंदाजे लाखोचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या 6 गाड्यांनी पाण्याचा फवारा केल्याने आग आटोक्यात आली. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली. ही घटना शनिवारी (दि. 12 फेब्रुवारी) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली. शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागल्याची ( Fire Broke Out ) प्राथमिक माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी केदार आवटे यांनी दिली.
आगीने केले रौद्ररुप धारण - व्यंकटेश भांडारी व सत्यनारायण गड्डम यांच्या टॉवेल कारखान्याला शनिवारी सकाळी अचानक आग लागली. आगीचे लोण बाहेर दिसताच आसपासच्या नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्नीशमन विभागाचे बंब घटनास्थळी दाखल होईपर्यंत आगीने रौद्ररुप धारण केले होते. त्यामुळे आणखी बंबाचे पाचारण करण्यात आली व आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्नीशमन दलाला यश आले.
अग्निशामक दलाचे केंद्र शहरातील एमआयडीसीत सुरू करण्याची मागणी - अग्निशामक दलाचे केंद्र सोलापुरातील रविवार पेठ, होटगी रोड परिसरात आहे. मात्र, शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसीमध्ये केंद्र नाही. आजच्या घटनेनंतर या परिसरात अग्निशामक दलाचे केंद्र सुरू करण्याची मागणी जोर धरत आहेत.
हेही वाचा - पिस्तुलाचा धाक दाखवत अश्लील कृत्य करायला भाग पाडणारी टोळी गजाआड'; सोलापूर पोलिसांची कामगिरी