सोलापूर - यंदाच्या शैक्षणिक वर्षातील शाळांची पहिली घंटा वाजली आहे. पहिल्या दिवशी मुलांचे औक्षण करून गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले आहे. पहिला दिवस प्रवेशोत्सव म्हणून शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी मोठया उत्साहाने साजरा केला. जिल्हा परिषद शाळांची वेळ सकाळी दहा ते सव्वापाच वाजेपर्यंत आहे. तर अनुदानित व खासगी काही शाळांची वेळ सकाळी 7.30 ते 11.30 व दुपारी बारा ते साडेपाचपर्यंत आहे.सकाळच्या सत्रात पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. मोठ्या आनंदाने विद्यार्थी शाळेत आले होते.
दोन वर्षानंतर वेळेत शाळा सुरू - कोरोनाच्या दोन वर्षांच्या संकटानंतर पहिल्यांदाच शाळा वेळेवर सुरू झाल्या आहेत. इयत्ता पहिलीतील विद्यार्थी पहिल्यांदाच शाळेत आले आहेत. त्या मुलांच्या मनातील शाळेविषयीची भीती दूर करण्याचे आणि अभ्यासात पिछाडीवर असलेल्या मुलांची गुणवत्ता सुधारण्याचे मोठे आव्हान शिक्षकांना पेलावे लागणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी प्रवेशोत्सव - शाळेचा बुधवारी पहिला दिवस असल्याने मंगळवारी १४ जूनला सर्व शाळांनी प्रवेशद्वारावर रांगोळी काढून फुगे लावले होते. शाळेत येताना मुलांचे औक्षण करून त्यांचे स्वागत करण्यात आले. शाळांची वेळ पूर्वीप्रमाणेच आहे. दोन वर्षे घरी बसून ऑनलाइन शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना शाळेच्या वातावरणात रुळवून त्यांची उपस्थिती शाळांना टिकवावी लागणार आहे.
विद्यार्थ्यांच्या पालकांनी खबरदारी घेणे आवश्यक - शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके दिली आहेत. दुसरीकडे, राज्यातील शहरांमध्ये कोरोना वाढत असल्याने त्याबद्दलह पालकांना खबरदारी घ्यावी लागेल. यंदा पालकांनी स्वत:हून विद्यार्थ्यांना मराठी किंवा सेमी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश घेतला आहे. पावसाची परिस्थिती पाहून शाळांनी दूरवरील मुलांना लवकर घरी पाठवावे, अशा सूचनाही प्रशासनाने शाळांच्या मुख्याध्यापकांना दिल्या आहेत.