पुणे - दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ व केंद्रातील मोदी सरकारने लादलेल्या अन्यायी कृषी कायद्या विरोधात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या पुणे येथील निवासस्थानासमोर युवक काँग्रेसच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. यावेळी पुणे व सातारा येथील युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रकाश जावडेकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
या आंदोलनात पुणे शहर युवक काँग्रेस अध्यक्ष विशाल मलके, पुणे ग्रामीण युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ दौंडकर, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव गणेश जगताप, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव दादासाहेब काळे, आदी पदाधिकारी तसेच युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शिवराज मोरे यांच्या सहित युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
शेतकऱ्यांना रस्त्यावर आणणारा अन्यायी कृषी कायदा तात्काळ रद्द करा -
केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्याची कोंडी करण्यासाठी अन्यायी कृषी कायदे संसदेत घाईगडबडीत मंजूर केले. या कायद्यांना विरोध करण्यासाठी गेली काही दिवस दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. दिल्लीतील थंडीत शेतकरी आंदोलन करत असताना त्यांच्या मागण्या किमान ऐकण्यात पंतप्रधान मोदी रस दाखवत नाहीत. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याऐवजी मोदी सरकारमधील मंत्री शेतकऱ्यांना खलिस्तानी आणि पाकिस्तान-चीन च्या पाठिंब्यावरील आंदोलन असे म्हणून हिणवत आहेत. अश्या मंत्र्यांना तात्काळ बडतर्फ करावे, उद्योगपतींना हवा असलेला व शेतकऱ्यांना रस्त्यावर आणणारा अन्यायी कृषी कायदा तात्काळ रद्द व्हावा. या मागणीसाठी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला प्रतिसाद देण्यासाठी युवक काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन झोपलेल्या मोदी सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्र्यांना व भाजप खासदारांना आंदोलन करून जाब विचारणार आहोत. अशी माहिती युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांनी दिली. यावेळी कार्यकर्त्यांनी किसानोंके सन्मान मे युवक काँग्रेस मैदान मे.. शेतकरी कायदा रद्द केलाच पाहिजे अश्या घोषणा दिल्या.