पुणे - नोकरी नसल्यामुळे नैराश्यात गेलेल्या एका 30 वर्षीय तरुणीने फेसबुकवर आत्महत्या करणार असल्याची पोस्ट लिहिली आणि घरात निघून गेली होती. मात्र, पोलिसांच्या निदर्शनास फेसबुकवरील ही पोस्ट आल्यानंतर त्यांनी तातडीने तपास करत त्या मुलीचा शोध घेतला आणि तिला आत्महत्येपासून परावृत्त केले.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, एक महिला आत्महत्या करणार असल्याबद्दल फेसबुकवर पोस्ट असल्याची माहिती महिला सहाय्यक कक्षाच्या सहायक पोलीस निरीक्षक सुजाता शानमे यांना मिळाली होती. हा सर्व प्रकार त्यांनी दामिनी पथकाच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर दामिनी पथकाच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी या महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली. फेसबुकवरील माहितीच्या आधारे या तरूणीचा मोबाईल नंबर आणि राहत्या घराचा पत्ता पोलिसांनी मिळवला. तिच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता तो बंद असल्याचे निदर्शनास आले.
त्यानंतर दामिनी पथकाच्या मार्शलने या तरुणीच्या घराच्या पत्त्यावर धाव घेऊन तिच्या आई-वडिलांना याबाबत कल्पना दिली असता त्यांनी ती सकाळी 9 वाजता घरातून बाहेर पडल्याचे सांगितले. पोलिसांनी तिच्या कुटुंबीयाकडून सदर तरुणीच्या मित्र-मैत्रिणीचे मोबाईल नंबर घेत त्यांना फोन केला. आणि त्यानंतर बराच वेळ शोधाशोध केल्यानंतर ही तरुणी सापडली. दामिनी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी या तरुणीला कोथरूड पोलिस ठाण्यात आणले.
त्याठिकाणी तिच्याकडे अधिक विचारपूस केली असता "नोकरी नसल्यामुळे मानसिक खच्चीकरण झाले आहे, त्यामुळे मी आत्महत्या करत आहे अशी पोस्ट फेसबुकला टाकली" असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. दामिनी पथकाच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी या तरुणीचे समुपदेशन केले आणि तिचे मनपरिवर्तन करत तिला आत्महत्येपासून परावृत्त केले. पोलीसांनी त्या तरुणीला तिच्या पालकांच्या ताब्यात सुखरूपपणे पोचवले.