पुणे : लक्षद्वीप मालदीव जवळ चक्रीवादळाच्या पट्ट्यामुळे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. यामुळे महाराष्ट्रात पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. पावसाबरोबर वाऱ्याचा वेग ताशी ६५ किलोमीटरवर पोहोचण्याचा अंदाज असून, १ आणि २ डिसेंबरला दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीजवळ, तर २ आणि ३ डिसेंबरला उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीजवळच्या समुद्रात मच्छीमारांनी जाऊ नये, असा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू
पुणे शहर, आणि जिल्ह्यात सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. ढगाळ वातावरणामुळे सकाळपासून सूर्यनारायणाचे दर्शन होऊ शकलेले नाही, तर अनेकांना मॉर्निंग वॉकला दांडी मारावी लागली. ऐन हिवाळ्यात पावसाने लावलेल्या हजेरीमुळे हवेत गारठा वाढला आहे.
चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
पुढील काही तासांत दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपमध्ये कमी दाबाच्या क्षेत्राची शक्यता आहे. परिणामी पुढील दोन दिवस राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. यात पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश आहे.
14 जिल्ह्यात मेघगर्जनेसह सरी
आज मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदूरबार या जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या काळात वाऱ्याचा वेगही वाढणार आहे.
२ डिसेंबरला या भागात पाऊस
२ डिसेंबरला मुंबई पावसाची शक्यता नाही. मात्र जवळच्या ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर रत्नागिरी, पुणे, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड या जिल्ह्यांतही मेघगर्जनेसह पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.