पुणे - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंग्याच्या आवाजाविरोधात भूमिका घेतली होती. भोंग्याचा आवाजाच्या दुप्पटीने हनुमान चालीसा लावावी, असे आदेश मनसेच्या कार्यकर्त्यांना दिले होते. यावर मनसेचे तत्कालीन शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी विरोधी भूमिका घेतली होती. माझ्या प्रभागात मी अशा पद्धतीने कोणत्याही प्रकारचे भोंगे लावणार नाही, अशी थेट भूमिका घेतल्यामुळे वसंत मोरे यांची शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली. या घटनेंतर मोरेंचे काय होणार? यावर तर्क वितर्क सुरू असताना आज वसंत मोरे ( Vasant More will meet Raj Thackeray ) हे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेणार आहे. या भेटीत नेमके काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - IPL 2022 RCB vs MI : विराट आणि रोहित शर्माला भेटणं चाहत्याला पडलं महागात; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
वसंत मोरे हे आज मुंबईत राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मनसेचे नेते बाबू वागस्कर हे राज ठाकरे यांचा निरोप घेऊन वसंत मोरे यांच्या घरी गेले होते. त्यांनी वसंत मोरे यांना राज ठाकरे यांचा निरोप दिला. राज ठाकरे यांनी सोमवारी तुम्हाला भेटायला बोलावले असल्याचे बाबू वागस्कर यांनी सांगितले. त्यामुळे, आता आज सोमवारी शिवतीर्थावरील बैठकीत काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. दरम्यान राज ठाकरे यांच्या भेटीपूर्वी वसंत मोरे कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतरच पुढील राजकीय दिशा ठरवणार असल्याची माहिती आहे.
वसंत मोरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. कारण नुकतेच वसंत मोरे यांनी आपण कार्यकर्त्यांना विचारल्याशिवाय कोणताच निर्णय घेत नाही, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे, कार्यकर्त्यांना भेटून मोरे आपल्या पुढील राजकारणाची दिशा ठरवणार आहेत का? अशी चर्चा सुरू झाली होती. वसंत मोरे आपल्या कात्रज येथील 'कृष्ण लीला' या निवासस्थानाच्या संपर्क कार्यलयात कार्यकर्त्यांना भेटले.