पुणे : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात गुरुवार, शनिवार आणि रविवार हे तीन दिवस लसीकरण बंद राहणार आहे. दिवाळी पाडव्याच्या दिवशी मात्र अर्धा दिवस लसीकरण मोहीम सुरू असणार आहे. दिवाळी निमित्त महापालिकेला काही दिवस सुटी आहे. या दरम्यान लसीकरण मोहिमही बंद राहाणार आहे.
सणासुदीचे दिवस असल्याने प्रतिसाद कमी
दिवाळीनिमित्त महापालिकेला काही दिवस सुटी राहणार आहे. त्यामुळे महापालिकेने लसीकरण मोहीमही बंद ठेवली आहे. सणासुदीचे दिवस असल्याने लसीकरणाला कमी प्रतिसाद मिळतो. त्यामुळेच लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे. गुरुवारी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी असल्याने त्या दिवशी सुट्टी देण्यात आली आहे. शुक्रवारी अर्धा दिवस लसीकरण सुरू राहणार असून, सकाळच्या सत्रात हे लसीकरण होणार आहे. शनिवार आणि रविवार पालिकेला सुटी असणार आहे.
हेही वाचा : राज्यात 'या' तारखेपर्यंत शंभर टक्के लसीकरणाचे मुख्यमंत्र्यांचे उद्दीष्ट, आज पंतप्रधान घेणार आढावा
अद्याप सव्वालाख लोक पहिल्या डोसपासून वंचित
सहा महिन्यांत सुमारे ३७ लाख ९० हजार २७ डोस देण्यात आले असून, त्यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या डोसचा समावेश आहे. १ मे पासून १८ वर्षांवरील वयोगटाच्या नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. त्यानंतर सरकारी लसीकरण केंद्रांमध्ये कोविशिल्डचे १८ लाख ३५ हजार ९३५, तर कोवॅक्सिनचे १ लाख ८६ हजार ३९७ डोस देण्यात आले.
याशिवाय, खासगी रुग्णालयात कोविशिल्डचे १६ लाख ५६ हजार ८१७, तर कोवॅक्सिनचे ७० हजार ४१ डोस देण्यात आले. या दोन्ही लसींबरोबरच खासगी रुग्णालयात स्फुटनिक लसही देण्यात आली असून, ४० हजार ८३७ जणांनी या लसीचे डोस घेतले आहेत. त्यामुळे खासगी आणि शासकीय रुग्णालयात कोविशिल्ड, कोवॅक्सिन आणि स्फुटनिक लसींचे मिळून ३७ लाख ९० हजार २७ डोस देण्यात आले आहेत.