पुणे - कर्नाटकमध्ये हिजाब प्रकरण चांगलंच तापलं आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालयांमध्ये धार्मिक पोशाख घालण्यास मनाई केली आहे. या घटनेचे देशभरात पडसाद उमटत आहेत. यावर विविध स्तरावरून प्रतिक्रिया येत आहेत. या घटनेचे पुण्यातही पडसाद उमटले आहेत. पुण्याच्या आझम कॅम्पस येथे हिजाबच्या समर्थनार्थ शिक्षिका आणि विद्यार्थिनी आक्रमक पाहायला मिळाल्या.
हिजाब परिधान करणं हा आमचा वैयक्तिक अधिकार आहे आणि तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही आणि असं जर असेल तर मग आम्ही पुढे जाऊन आमच्या अल्लाला काय उत्तर देणार अशा आक्रमक भूमिकेत या विद्यार्थ्यांने आपली मतं स्पष्ट केली. हिजाब हा आमचा संस्कृतीतला एक भाग आहे आणि तो आम्ही परिधान करणारच आणि कर्नाटकातील विद्यार्थिनींना आमचा पूर्ण पाठिंबा आहे असे मत येथील विद्यार्थिनींनी स्पष्ट केलं. तर येथील शिक्षिका म्हणाल्या की मुलींनी काय घालायचं काय नाही घालायचं हे पूर्णपणे त्यांचा परिवार त्यांचे आई-वडील आणि त्यांचा हक्काचा प्रश्न आहे. त्यामुळे मुलींनी कपडे काय घालावे यासाठी रोख लावली जात असेल तर हे पूर्णपणे चुकीचे आहे. मुलींना स्वातंत्र्य विचार करायला मुभा आहे आणि ते काहीही कपडे घालू शकतात असा आमचा विचार आहे.
पुण्यात हिजाबच्या समर्थनार्थ आझम कॅम्पस येथील मुस्लिम महिलांनी आणि शिक्षकांनी कर्नाटकातील मुलींना पाठिंबा दिला आहे. हिजाब आमचा अधिकार आहे, आमचा अधिकार कोणीही काढू शकत नाही, असा पवित्रा येथील शिक्षकांनी आणि विद्यार्थिनींनी घेतला होता. तर येथील अंजुम इनामदार म्हणाले की खरं तर कोणत्याही शैक्षणिक संस्थेमध्ये मजहब किंवा धर्म शिकवला जात नाही आणि हा निर्णय पूर्णपणे योग्य आहे. मात्र हीजाबवर बंदी घातली आहे. तर उद्या कुठल्याही शीख मुलाने पगडी धारण न करता शाळेमध्ये यावे असा निर्णय घेतला जाणार आहे का? याचे उत्तर मात्र गुलदस्त्यात आहे, असेही ते म्हणाले.