पुणे - उसने पैसे घेऊन रक्कम परत करण्यास नकार देणारे सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांचे वडील दत्तात्रय नरसिंह शिंदे यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. यामध्ये चेक बाऊन्स प्रकरणी सहा महिन्यांचा तुरुंगवास तसेच 60 लाख रुपये भरपाई देण्याचा आदेश अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एन. एन. पाटील यांनी दिला आहे. तसेच दंड न भरल्यास वाढीव एक वर्षाची शिक्षा भोगावी लागेल, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.
याप्रकरणी व्यावसायिक महेशकुमार जे. अट्टल यांनी चेक बाऊन्स झाल्याने 15 वर्षापूर्वी म्हणजे 13 नोव्हेंबर 2003 रोजी खटला दाखल केला होता. काही काळानंतर संबंधित खटला सहा महिन्यांत निकाली काढण्याचे आदेश देण्यात आले होते.
तक्रारदार आणि त्यांचे कुंटुंब हे गगनगिरी महाराजांचे भक्त होते. तसेच दत्तात्रय शिंदे हे देखील गगनगिरी महाराजांचे भक्त होते. त्यांनी या महाराजांच्या नावे धनकवडी परिसरात मठ स्थापन केला होता. त्या ठिकाणी तक्रादार पुजेसाठी जात होते. महेशकुमार हे शिंदे यांना गुरू मानत होते.
तक्रारदार यांनी शिंदे यांना 11 जानेवारी 2001 ते 5 सप्टेंबर 2002 या कालावधीत कर्ज काढून काही रक्कम दिली होती. परंतु, तक्रारदारांनी रक्कम परत मागितल्यानंतर त्यांना 14 लाख 13 हजार रुपये, 12 लाख 59 हजार 713 रुपये, 13 लाख 32 हजार 500 असे विविध तारखेचे धनादेश दिले. परंतु, हे धनादेश वटल्याने त्यांनी शिंदे यांच्या विरोधात तक्रार दाखल करून न्यायालयात धाव घेतली.