पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्ष पायी वारी सोहळा झाला नव्हता. यंदाच्या वारी सोहळ्यानिमित्त लाखो वारकरी हे यंदाच्या आषाढी वारीत सहभागी झाले आहेत. आषाढी वारी निमित्त मानाच्या पालख्यांचा इतिहास काय हे जाणून घेऊया.. संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचा ( Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohla ) नेमका इतिहास काय आहे हे आपण जाणून घेऊया....
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा हे महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक आणि धार्मिक वैशिष्ट्य मानले जाते. श्री क्षेत्र आळंदी येथून निघालेली संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आषाढी एकादशीचा आदल्या दिवशी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचते. या वारीचा मार्ग निश्चित ठरलेला असतो. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका रथात ठेवल्या जातात. या रथाच्या पुढे आणि मागे वारकरी मंडळीं आपापल्या दिंडीतून पायी चालत जातात.
काय आहे इतिहास - संत ज्ञानेश्वर महाराज यांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी हे आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूर येथे पायी वारी करीत असत असे संदर्भ मिळतात. त्यांच्यानंतर संत ज्ञानेश्वर व भावंडे यांनी वारीची परंपरा सुरू ठेवली. श्री हैबतबाबांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून दिंडी-समारंभांसह, थाटाने ऐश्वर्याने व सोहळ्याने पंढरपूरला नेण्याची प्रथा चालू केली. तिला आज आणखी वैभव प्राप्त झाले आहे. श्री ज्ञानदेवांच्या पालखी सोहळ्यास पूर्वी हत्ती, घोडे वगैरे लवाजमा श्रीमंत राजेसाहेब (औंध) यांच्याकडून येत असे. या खर्चास साहाय्य त्या त्या वेळचे राजे व श्रीमंत पेशवे सरकार करीत असे. पुढे कंपनी सरकारचा अंमल सुरू झाल्यावरही खर्चाची तरतूद सरकारकडून होत असे. सरकारने इ.स. १८५२ मध्ये पंचकमिटी स्थापन करून त्या कमिटीच्या नियंत्रणाखाली ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची व्यवस्था केली. यंदाच्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला आज 300 हून वर्ष झाली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात मानाच्या 51 दिंड्या असतात. आणि जेव्हा आळंदी येथील मंदिरातून पालखीचं प्रस्थान होतो तेव्हा मानाच्या दिंड्या प्रदक्षिणा घालतात आणि मगच पालखी प्रस्थान होते.
कसा असतो श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा - श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा श्रीक्षेत्र आळंदी, ता. खेड, जि पुणे ते श्रीक्षेत्र पंढरपूर, जि. सोलापूर असा प्रवास करतो. श्रीक्षेत्र आळंदी ते श्रीक्षेत्र पंढरपूर यामध्ये हा सोहळा पुणे, सातारा आणि सोलापूर अशा तीन जिल्ह्यातून जातो. हा पालखी सोहळा आपल्या पायी प्रवासात १७ ठिकाणी मुक्काम करतो. यामध्ये पुणे जिल्ह्यात ७, सातारा जिल्ह्यात ४ आणि सोलापूर जिल्ह्यात ६ ठिकाणी मुक्काम असतो. या पालखी सोहळ्याचे १२ ठिकाणी विसावे आहेत. या पालखी सोहळ्याची उभे / गोल रिंगण ७ ठिकाणी आहेत. हा पालखी सोहळा आषाढ शु. पौर्णिमा पर्यंत पंढरपूरमध्ये थांबतो. त्यानंतर परतीच्या प्रवासात निघतो. याचा स्वतंत्र असा परतीचा कार्यक्रम असतो. हा पालखी सोहळा श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, श्रीक्षेत्र आळंदी, ता. खेड, जि. पुणे यांच्या मार्फत संचलित केला जातो.
लाखो भाविक वारीत होतात सहभाग - संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात राज्यभरातून लाखो भाविक हे सुरुवातीला आळंदी येथे येतात. आणि मग तेथून पायी वारीत सहभाग घेत असतात. सुरुवातीला आळंदी येथील इंद्रायणी काठीस्नान करून वारकरी टाळ मृदंगाच्या गजरात पालखी प्रस्थानच्या वेळेस असतात. मग ज्या ज्या मार्गाने पालखी प्रस्थान करत असते, त्या त्या मार्गावर लाखो भाविक हे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला उपस्थित असतात.
कोरोनामुळे 2 वर्ष खंड - कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्वकाही बंद असताना गेली 2 वर्ष संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा देखील पायी न करता हा सोहळ्या एसटीने पूर्ण करण्यात आला होता. गेली दोन वर्ष वारकऱ्यांना हा पायी सोहळा अनुभवता न आल्याने यंदाच्या वर्षी या सोहळ्यात लाखो भाविक हे उपस्थित असून माऊली माऊलीच्या गजरात पायी पालखीत सहभागी झाले आहे.
संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचे वेळापत्रक - कोरोनाच्या दोन वर्षांच्या खंडानंतर यंदाच्या वर्षी पंढरपूरची आषाढी वारी पुन्हा एकदा होणार आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे विविध प्रकारची बंधनं या सोहळ्यावर आली होती. कधी एसटीने तर कधी वेगळ्या पद्धतीने संतांच्या पालख्या पंढरपुरात दाखल झाल्या होत्या. आता मात्र कोरोनाची सर्व बंधने रद्द केल्यामुळे चंद्रभागेच्या वाळवंटात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी एकत्र येत आहे. संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचे प्रस्थान 21 जून रोजी लाखो भाविकांच्या उपस्थित झाले होते. यंदा पालखी सोहळ्यात तिथीची वृद्धी झाली आहे. त्यामुळे लोणंदमध्ये अडीच दिवस तर फलटणमध्ये दोन दिवस पालखी मुक्कामी असेल.
- मंगळवार 21 जून रोजी सायंकाळी 4 वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आळंदी येथून प्रस्थान -
- बुधवार 22 व गुरुवार दि 23 रोजी पुणे , शुक्रवार 24 व शनिवार 25 रोजी सासवड -
- रविवार 26 रोजी जेजुरी, सोमवार 27 रोजी वाल्हे, मंगळवार 28 व बुधवार 29 रोजी लोणंद -
- गुरुवार 30 रोजी तरडगांव, शुक्रवार 1 व शनिवार 2 जुलै रोजी फलटण -
- रविवार 3 रोजी बरड, सोमवार 4 रोजी नातेपुते, मंगळवार 5 रोजी माळशिरस -
- बुधवार 6 रोजी वेळापूर , गुरुवार 7 रोजी भंडीशेगाव -
- शुक्रवार 8 रोजी वाखरी तर शनिवार 9 रोजी श्री क्षेत्र पंढरपुर मुक्कामी सोहळा पोहोचेल. -
- रविवार 10 जुलै रोजी आषाढी एकादशीचा महासोहळा होणार आहे. -
- पालखी सोहळ्यात चांदोबाचा लिंब, बाजीराव विहीर व इसबावी येथे उभे रिंगण होईल. -
- पुरंदावडे (सदशिवनगर), पानीव पाटी, ठाकुरबुवा व बाजीराव विहीर येथे अश्वांचे गोल रिंगण होणार आहे.