पुणे - 30 जानेवारीला पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेमध्ये अलीगढ विद्यापीठातील विद्यार्थी नेता शरजील उस्मानी याने हिंदू धर्माबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे पुण्यातील स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आता शरजील उस्मानीवर पोलीस कधी करावी करतात याकडे लक्ष लागले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.
तपास सुरू आहे - पुणे पोलीस
भाजपकडून या प्रकरणात तातडीने कारवाई करावी अशी मागणी होत आहे. या संदर्भात कारवाई सुरू असल्याचे पुणे पोलीस सांगत आहेत. मात्र, शरजील उस्मानीला अटक करण्यासाठी पथक रवाना झाली आहेत का याबाबत पोलीस अधिक तपशील न देता तपास सुरू असल्याचे सांगत आहेत. दुसरीकडे या प्रकरणात शरजील उस्मानी याचे वक्तव्य चुकीचे होते असे एल्गार परिषदेचे आयोजक बी. जे. कोळसे पाटील यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - 'राज्य सरकारच्या हट्टामुळे 739 मराठा विद्यार्थ्यांचे भविष्य धूसर'
दरम्यान, या प्रकरणात शरजील याचे वक्तव्य चुकीचे होते, त्यावेळी न्यायाधीश राहिलेले लोक उपस्थित होते त्यांनी त्याला थांबवायला पाहिजे होते, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. त्यामुळे एकंदरीतच या प्रकरणात आता पुणे पोलिसांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष आहे.
हेही वाचा - 'जनतेची सहानुभूती मिळविण्याचा भाजपाचा केविलवाणा प्रयत्न'