पुणे - या वर्षाच्या सुरुवातीपासून शहरात हेल्मेट सक्ती लागू करण्यात आली होती. यंदा वर्षभरात पोलिसांनी हेल्मेट न घालणाऱ्या पुणेकरांना तब्बल 81 कोटींचा दंड ठोठावला आहे. वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईत 16 लाख दुचाकीस्वारांकडून दंडाची रक्कम आकारण्यात आली आहे. वाहतूक विभागाने प्रत्यक्ष चौकांमध्ये थांबून तसेच सीसीटीव्हींमार्फत ही कारवाई केली आहे.
न्यायालयाच्या निर्णयानंतर शहरात हेल्मेट बंधनकारक करण्यात आले. यानंतर शहर पोलिसांनी नियम मोडणाऱयांच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली. संबंधित हेल्मेट सक्तीला हेल्मेट विरोधी कृती समितीने विरोध केला होता. यावेळी आंदोलन झाले. तसेच मोर्चे देखील काढण्यात आले होते.
हेही वाचा : अजब शक्कल..! हेल्मेटेशिवाय दूचाकीस्वारांना नाही शासकीय कार्यालयात प्रवेश
या संपूर्ण प्रकारावर हेल्मेट विरोधी कृती समितीने नाराजी व्यक्त केली आहे. पोलिसांनी गुजरात सरकारसारखी ऐच्छिक हेल्मेट सक्ती करावी, असा टोला या समितीने लावला आहे. या समितीचे पदाधिकारी अंकुश काकडे यांनी पोलीस शंभर कोटींचा पल्ला गाठत आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला. याबाबत जुन्या सरकारने घेतलेला निर्णय नवीन सरकारने रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यामुळे पोलिसांनी वसुल केलेल्या दंडावर देखील पुणेकर टीका करत आहेत. तसेच पोलिसांनी देखील या प्रकरणावर बोलण्यास नकार दिला आहे.