पुणे - लॉकडाऊनमुळे मागील अडीच महिन्यांपासून बंद असलेले प्रादेशिक परिवहन कार्यालयातील नियमित कामकाज आजपासून (गुरुवार) सुरू झाले आहे. मात्र, पक्का आणि शिकाऊ परवाना घेण्यासाठी आता कार्यालयामध्ये येताना प्रत्येकाला ऑनलाईन अपॉइंटमेंट घ्यावी लागणार आहे.
कार्यालयातील गर्दी कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. परवाना कोटाही जवळपास 80 ते 85 टक्क्याने कमी करण्यात आलेला आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे येथे शिकाऊ परवाना, पक्का परवाना, योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण आणि अन्य कामे सुरू करण्यात आली आहेत, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी दिली.
हेही वाचा... ...अखेर मंत्री थोरात अन् चव्हाण यांच्या मुख्यमंत्री भेटीला मिळाला मुहूर्त
पाचव्या लॉकडाऊनमध्ये सरकारकडून काही अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. त्यानुसार २० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती पुणे आरटीओतील कामकाज सुरू करण्यात आले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून येथील सर्व काम बंद होते. त्यामुळे पक्का परवाना, प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे येथे शिकाऊ परवाना, पक्का परवाना, फिटनेस तपासणी, वाहनांची नोंदणी, शिकाऊ परवाना यांसारखी अनेक वाहन विषयक कामे प्रलंबित होती.
परिवहन विभागाने हिरवा कंदील दाखवल्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, सोशल डिस्टन्सिंगचा विचार करता या कामांसाठी कार्यालयाकडून आता पूर्वीपेक्षा कमी कोटा असणार आहे. मोजक्याच अर्जदारांना कार्यालयात उपस्थित राहावे लागणार आहे. आरटीओतील कामकाजाकरिता 'परिवहन.जीओव्ही.इन' या संकेतस्थळावर अर्ज करावा, असेही अजित शिंदे यांनी सांगितले.