पुणे - देशासह राज्यात १६ मार्चपासून १२ ते १४ वर्ष या वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. या वयोगटातील मुलांना कोर्बेवॅक्स ही लस (Corbevax vaccine) देण्यात येणार आहे. पुण्यात देखील या वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. पण, यात एक मोठी अडचण येत आहे ती खासगी रुग्णालयांची, कारण 12 ते 14 वयोगटातील लहान मुलांसाठी कोर्बेवॅक्स लस विकत घेऊन लसीकरण करण्यास खासगी रुग्णालय चालकांना अडचणीचे वाटत आहे.
काय आहे नेमकं कारण?: पुण्यातील अनेक खासगी रुग्णालयांनी लसीकरणासाठी घेतलेल्या कोविशील्ड या लसीचे अनेक डोस हे मोठ्या प्रमाणात वाया गेले आहेत. त्यामुळे आता कुठल्याही प्रकारची लस न घेण्याचा निर्णय काही खासगी रुग्णालयांनी घेतला आहे. तसेच लसीचे अनेक डोस शिल्लक असल्याने दोन्ही डोस घेतलेल्यांना बूस्टर डोस द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. एकेकाळी कोरोनावर लस घेण्यासाठी खासगी रुग्णालयांच्या बाहेर मोठी रांग पाहायला मिळायची. मात्र, आता लसींचा साठा वाया जात असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
शहरात 12 ते 14 वयोगटातील इतकी मुले आहेत पात्र : पुणे शहरात एकूण लोकसंख्येच्या ३.७१ टक्के हे 12 ते 14 वयोगटातील मुलांची संख्या आहे, ज्यांचे लसीकरण होणार आहे. 12 ते 14 वयोगटात जवळपास १ लाख ४० हजार मुलांचे लसीकरण होणार आहे. यात पहिला डोस घेतल्याच्या २८ दिवसांनंतर दुसरा डोस दिला जाणार आहे.
पुण्यात इतक्या लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध : 12 ते 14 वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यासाठी पुण्यात महानगर पालिकेतर्फे एकूण 30 लसीकरण केंद्र उभारण्यात आलेली आहेत. त्यात पुणे महापालिकेतर्फे प्रत्येक लसीकरण केंद्राला दीडशे लसीचे डोस देण्यात येणार आहेत. पण, आता आहेत ते लसीचे डोसच वाया जात असल्याने. शहरातील खासगी रुग्णालये स्वतःहून कोर्बेवॅक्स या लसीची खरेदी करणार का? आणि १२ ते १४ या वयोगटातील मुलांचे लसीकरण व्यवस्थित होणार का? हाच प्रश्न उपस्थित होत आहे.