पुणे- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालवताना मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले होते. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने आणि कोरोनावरील लस आल्याने या नियमामध्ये सूट देण्यात आली आहे. पुणे शहरात चारचाकी वाहनात कुटुंबियांसोबत प्रवास करताना मास्कची गरज नसल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
कुटुंबियांसोबत चारचाकी वाहनातून पुणे महापालिका हद्दीतून प्रवास करताना मास्क घालण्याची आवश्यकता नाही. ही सवलत केवळ खासगी वाहनांसाठी आहे. यात प्रवास करणाऱ्या व्यक्ती कुटुंबातीलच असाव्यात, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
हेही वाचा-विना मास्क फिरणार्या ४ लाख ८५ हजार नागरिकांवर कारवाई; १० कोटी ७ लाखाचा दंड वसूल
कोरोना आटोक्यात आल्याने मास्क सक्तीचा निर्णय मागे-
राज्यात मुंबई, ठाणे आणि पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येते आहे. या पार्श्वभूमीवर चारचाकी वाहनातून प्रवास करताना मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले होते. एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, पुण्यातील कोरोना नियंत्रणात आला आहे. त्यामुळे पुणे महापालिकेने वाहन चालविताना मास्क घालण्याची सक्ती असणारा नियम मागे घेतला आहे.
मुंबई महापालिकेनेही मास्क घालण्याचे नियम केले शिथील-
महाराष्ट्रसह मुंबईत मास्क वापरणे सक्तीचे होते, त्यातही शिथिलता देण्यात आली आहे. खासगी वाहनांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मास्कच्या कारवाईतून वगळण्याचे तोंडी आदेश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी प्रशासनाला आणि क्लिनअप मार्शलला दिले आहेत.