पुणे - पुण्यात पेट्रोलचा दर 99.63 रुपये प्रतिलिटर वर जाऊन पोहोचला आहे. शंभरी गाठण्यासाठी आता अवघे काही पैशेच शिल्लक असल्याने पुण्यात पेट्रोल शंभरी गाठणार आहे. पॉवर पेट्रोलचे दर या आधीच शंभरच्यावर पोहोचले आहेत. पेट्रोल दरवाढ सध्या सामान्य नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत. पुण्यात गेल्या आठवड्यापासून पेट्रोलच्या दरामध्ये वाढ सुरूच आहे. पुण्यात गेल्या आठवड्यात पेट्रोलचे दर 99.31 रुपये इतके होते. आता त्यामध्ये वाढ होऊन पेट्रोल 99.63 वर पोहोचले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने इंधनाच्या दरामध्ये वाढ होत आहे. एकीकडे कोरोनामुळे अनेक नागरिकांनी आपले रोजगार गमावले आहेत, सर्व व्यवहार बंद असल्यामुळे आर्थिक उलाढाल ठप्प आहे. अशा परिस्थितीमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ होत असल्याने, सर्व सामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत.
घरगुती गॅसच्या दरातही वाढ
गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल- डिझेलमध्ये तर दरवाढ होतच आहे. मात्र आता घरगुती गॅसचे दर देखील वाढवण्यात आले आहेत. आता प्रति गॅस सिलिंडरचे दर 820 इतके झाले आहेत. सातत्याने होत असलेल्या दरवाढीमुळे महागाईचा भडका उडाला आहे. इकीकडे कोरोनाची दुसरी लाट तर दुसरीकडे महागाईचे संकट यामुळे नागरिक आर्थिक आडचणीत सापडले आहेत.
हेही वाचा - धोका वाढला! व्हाइट फंगसमुळे आतड्यात पडले छिद्र; जगातील पहिलीच केस